विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रस्तावित शुल्कवाढ स्थगित करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांसाठी (२०२०-२१) शुल्कवाढ होणार नसल्याने लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरू ठेवली जाणार आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सोमवारी कु लगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या विद्या परिषदेने शुल्कवाढीला स्थगिती देण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेला के ली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे म्हणाले, की प्रस्तावित शुल्कवाढीला स्थगिती देण्याबरोबर विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयात शुल्क भरण्याबाबत कोणत्याही प्रकारे सक्ती करता येणार नसल्याचाही ठराव करण्यात आला. तसेच विद्यापीठाची अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतची कार्यवाही सुरू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

खर्चाला कात्री

टाळेबंदीमुळे विद्यापीठाची मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिसभा होऊ शकली नव्हती. आता निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात काही बदल करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. त्यानुसार येत्या वर्षांत विद्यापीठाचे उत्पन्न काही प्रमाणात घटण्याची शक्यता विचारात घेऊन खर्चालाही कात्री लावली जाणार आहे. त्यानुसार विद्यापीठाला खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी खर्च कमी करण्यात येणार आहेत. त्याचे बदल अंदाजपत्रकात के ले जातील.