18 October 2019

News Flash

अवकाश, खगोल संशोधनासाठी ‘सितारा’ प्रकल्प

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुकाचा पुढाकार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुकाचा पुढाकार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आंतरविद्यापीठ खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) यांनी पुढाकार घेऊन ‘सितारा’  या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. आगामी काळातील अवकाश आणि खगोल प्रकल्पातील संशोधनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

सितारा (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-आयुका प्रशिक्षण आणि संशोधन सहकार्य) या प्रकल्पाचे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विज्ञान प्रशालेत सोमवारी उद्घाटन झाले. गेल्याच आठवडय़ात विद्यापीठ आणि आयुका यांनी संयुक्त संशोधन प्रकल्प, नवीन अभ्यासक्रम यांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान आणि उपकरणशास्त्र या पाच विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसह आयुका काम करणार आहे. लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्सर्वेटरी (लिगो) या आंतरराष्ट्रीय प्रकल्पासह इस्रोच्या आदित्य १ या सूर्यमोहिमेतही आयुकाचा सहभाग आहे. या पाश्र्वभूमीवर, विद्यापीठ आणि आयुका यांनी संयुक्त प्रकल्प हाती घेतला आहे.

आगामी काळात सितारा अंतर्गत पेलोड इंटिग्रेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर विद्यार्थी छोटे उपग्रह तयार करू शकतील. मात्र, या सेंटरची कल्पना अद्याप प्राथमिक स्तरावर असून, त्यासाठी विविध प्रकारच्या परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत.

केंद्र सरकारच्या ज्ञान समूह प्रकल्पासाठी (नॉलेज क्लस्टर प्रोजेक्ट) पुण्याच्या निवडीची बैठक प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांच्या उपस्थितीत झाली.

विद्यापीठातील विविध विभागांसह जोडले जाऊन काम करण्याचा हा प्रयोगशील प्रयत्न आहे. ही प्रयोगशाळा प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून काम करेल. दोन्ही संस्थातील विद्यार्थी आणि प्राध्यापक लिगोसह काही अवकाश विज्ञानाच्या प्रकल्पांत काम करतील. तसेच पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम सुरू करण्याची कल्पना आहे. त्यात संशोधन प्रकल्पांसाठीच्या प्रशिक्षणाचा समावेश असेल.

डॉ. सोमक रायचौधुरी, संचालक, आयुका

First Published on October 10, 2019 5:22 am

Web Title: savitribai phule pune university sitara project for space and astronomy research zws 70