News Flash

‘लोकपरंपरेतील सीता’ उलगडणार सीतेचे विविध पैलू – डॉ. तारा भवाळकर यांची अमृतमहोत्सवी वर्षांतील भेट

सीतेचे विविध पैलू उलगडणारे ‘लोकपरंपरेतील सीता’ या पुस्तकलेखनाद्वारे ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर वाचकांना आपल्या अमृतमहोत्सवी वर्षांची अनोखी भेट देणार आहेत.

| June 18, 2014 03:00 am

निरंतर अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यमातून लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचा धांडोळा घेणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांना रामायणातील ‘सीता’ ही व्यक्तिरेखा खुणावत आहे. सीतेचे विविध पैलू उलगडणारे ‘लोकपरंपरेतील सीता’ या पुस्तकलेखनाद्वारे त्या वाचकांना आपल्या अमृतमहोत्सवी वर्षांची अनोखी भेट देणार आहेत.
राजा जनकाची कन्या जानकी आणि प्रभू श्रीरामचंद्र यांची पत्नी ही सीतेची आपल्याला असलेली ओळख. पण, ही सीता आपल्या लोकपरंपरेत कशी आली आहे याचा वेध या पुस्तकातून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे डॉ. तारा भवाळकर यांनी सांगितले. वेगवेगळ्या भाषेतील वैविध्यपूर्ण गीते, आख्याने आणि कथांतून दिसणारे प्रतििबब कसे भावते याचा अभ्यास केला आहे. बंगाली, गडवाली, तमीळ या प्रादेशिक भाषांसह कोकणी आणि वैदर्भीय बोलीतील मराठी अशा आतापर्यंत दहा कथांचा अभ्यास झाला आहे. या लोकपरंपरेतील सीता ही आपल्याला माहीत असलेल्या वाल्मीकी रामायणापेक्षा भिन्न आणि क्रांतिकारी आहे, असेही भवाळकर यांनी सांगितले.
लोकसाहित्य आणि लोकपरंपरेचा धागा गुंफत लेखन करणाऱ्या व्यक्तिरेखांवर आधारित ‘अभ्यासक स्त्रिया’ हे डॉ. तारा भवाळकर यांचे पुस्तक प्रकाशनासाठी सिद्ध झाले आहे. ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा या पुस्तकातून परिचय करून दिला आहे. भारती विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचे भवाळकर यांनी सांगितले. याखेरीज लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे, ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांच्या मी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतींचा समावेश असलेले पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती पडेल, असेही त्यांनी सांगितले.
 
अध्यक्षपदात रस नव्हताच
सांगली येथील नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. तारा भवाळकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र, या पदाचा आपल्याला रस कधीच नव्हता, असे सांगून डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, आपल्या गावी संमेलन होत असताना रंगभूमी क्षेत्रात मूलभूत अभ्यास करणारी व्यक्ती असावी या उद्देशातून नाटय़ परिषदेच्या सांगली शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी माझे नाव सुचविले. हा त्यांच्या प्रेमाचा भाग असल्यामुळे मी विरोध केला नाही. मात्र, रंगभूमीवर काम करणाऱ्या नटाला असलेले वलय अभ्यासकाला नसते, याची जाणीव असल्याने माझे नाव मागे पडेल याची खात्री होती आणि तसेच झाले, असेही भवाळकर यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2014 3:00 am

Web Title: seeta in folk tradition by dr tara bhavalkar
Next Stories
1 उत्पन्नाचे स्रोत नसल्यास पगाराचे वांदे होतील- महेश लांडगे
2 पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित करणार
3 कामगार क्षेत्रातील तीव्र नाराजीचा राष्ट्रवादीला फटका’ – राष्ट्रवादीच्या कामगार नेत्याचे शरद पवारांना पत्र
Just Now!
X