शरद पवार यांचे मत

पुणे : शेतकरी आंदोलनात तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. स्वत: पंतप्रधान, संरक्षणमंत्री किंवा नितीन गडकरी यांच्यासारखे वरिष्ठ नेते पुढे आले तर यामध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

वरिष्ठ मंत्री पुढे आले तर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी मार्ग काढण्यासाठी संवाद साधण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.  आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘अभिवादन’ कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले,‘स्वातंत्र्यानंतर देशात अशा प्रकारची अति टोकाची भूमिका कधीही घेतली गेली नव्हती. त्यातून सरकारचा दृष्टिकोन दिसून येतो. अन्नदाता रस्त्यावर बसतो तेव्हा त्याबद्दल सामंजस्य दाखवण्याची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने पुढाकार घेण्याची गरज आहे. मी मध्यस्थी करावी असे कोणी सुचवलेले नाही.’’

शरद पवार म्हणाले…

  •  विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसचे आहे. मात्र,असे पद भरले जाते तेव्हा सहयोगी पक्षांशी विचारविनिमय करण्याची पद्धत आहे.
  •  शेतकरी आंदोलनाबाबत भारतातील मान्यवरांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल सामान्य लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टींमध्ये बोलताना काळजी घ्यावी,’ असा  माझा सचिनला (तेंडुलकर) सल्ला राहील.
  •  शेती हा राज्यांचा विषय असल्याने शेतीच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा, असे माझ्या पत्रात म्हटले आहे.