18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांपेक्षा माणसे वाचण्याचा छंद जोपासला

रुग्णांशी संवाद साधताना आपुलकी आणि मनमोकळेपणा या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या.

वीरेंद्र विसाळ | Updated: October 13, 2017 3:41 AM

डॉ. के. एच. संचेती (ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ)

एखाद्या क्षेत्रात यशाची उंची गाठणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये शेकडो पुस्तके असतात. तो व्यक्ती कित्येक तास त्या पुस्तकांचे वाचन करतो, चिंतन करतो असे अनेकदा आपल्या कानावर पडते. मात्र, या सर्वापेक्षा माझा प्रवास १८० अंशांनी वेगळा आहे. आमचे किराणा मालाचे दुकान असल्याने वाचनाशी फारसा संबंध नव्हता. त्यामुळे पुस्तकांच्या वाचनामध्ये मी फारसा रमलो नाही. पुस्तकांपेक्षा आयुष्यात भेटलेली माणसे वाचणे आणि त्यांच्याकडून अधिकाधिक ज्ञान संपादन करण्याचा जोपासलेला छंद माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील यशाचे गमक आहे.

रुग्णांशी संवाद साधताना आपुलकी आणि मनमोकळेपणा या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. या दोन्ही गोष्टी माझ्याजवळ असल्याने वैद्यकीय क्षेत्रात काम करताना मी भरारी घेऊ शकलो. माझी आई (वसंताबाई) आणि वडील (हस्तिमल) या दोघांसोबत लहानपणी आमच्या किराणा माल दुकानात काम करीत असे. त्यामुळे खेळ किंवा वाचनाची गोडी लागणे किंवा त्यासाठी वेळ मिळणे, तसे शक्य नव्हते. दुर्दैवाने माझा पुस्तक वाचनाचा वेगही कमी असल्याने माझ्याकडून तुरळक पुस्तकांचे वाचन झाले. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळा, फग्र्युसन महाविद्यालय, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटल या सर्व संस्थांमध्ये मी बहुतांश प्रमाणात अभ्यासाची व वैद्यकीय क्षेत्राशी निगडित पुस्तकेच वाचत होतो.

नारायण पेठेमध्ये आमचे घर होते. आमची मातृभाषा जरी मारवाडी असली, तरी मी गुजराती भाषा बोलायला लवकर शिकलो. काही ना काही कारणाने माझे ब्रिटिश लायब्ररीमध्ये जाणे होत होते. त्या काळात स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकांच्या वाचनाने मी भारावून गेलो. अमेरिकेतील त्यांच्या भाषणातील मुद्दे आजही माझ्या मनात ताजे आहेत. रोजच्या जीवनात आपली वागणूक कशी असावी, याचे धडे मला त्या पुस्तकांतून मिळाले. समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना लागणारी विनम्रता मी या पुस्तकांतून शिकलो. एखाद्या व्यक्तीसोबत लवकर एकरूप होण्याची कला माझ्याकडे असली, तरी त्याला दिशा देण्याचे काम या पुस्तकांनी केले.

शालेय जीवनात बाबुराव अर्नाळकरांच्या गूढकथा मी वाचल्या. तर, विविध क्षेत्रातील नामवंतांची चरित्रात्मक पुस्तके देखील आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वाचत गेलो.

वाचन आणि त्यातून मिळणारा बोध ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रकाशमार्ग दाखविणारी विजेरी आहे, असे मला वाटते. वैद्यकीय क्षेत्रासोबतच स्थापत्यशास्त्र आणि अकाउंट्स या दोन विषयांची मला आवड होती. त्यामुळे अनेकदा माझ्या स्थापत्यशास्त्र क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांसोबत चर्चा करून त्यांच्याकडून माहिती मिळवीत मी स्थापत्यशास्त्राचे धडे घेतले. त्यासोबतच अकाउंट्स हाही माझा आवडता विषय. काही वर्षांपूर्वी अकाउंट्स कमिशनर डॉ. प्रधान असताना दिल्ली येथे अनेक खेपा घालून रिसर्च सेक्शन ३५ (२-ए) हे प्रमाणपत्र मिळविणारा मी भारतातील पहिला व्यक्ती होतो. त्यामुळे मला १९९० मध्ये नॅशनल कॉन्फरन्स ऑफ सीए मध्ये पेपर वाचन करण्यास निमंत्रित केल्याची घटना आठवली की आजही मनाला आनंद होतो. वैद्यकीय क्षेत्राप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील सखोल ज्ञान व अवांतर माहिती मिळविण्याकरिता कायमच माझी धडपड सुरू असे.

वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांना आपल्याकडील ज्ञान द्यावे, यासाठी सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत मी दररोज मार्गदर्शन करतो. त्यांच्या शंकांमधून मला नव्या गोष्टी शिकायला मिळतात. तसेच त्या गोष्टीतून पुस्तके वाचण्याची तसेच अन्य इतर माध्यमांतून शोधण्याची ऊर्मी मिळते. गुडघा प्रत्यारोपणासारखे विषय आम्हाला पुस्तकांतून कळत नाहीत, अशी अनेक विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यांना सोप्या पद्धतीने शास्त्रीयदृष्टय़ा महत्त्व पटवून देत तो विषय शिकविण्याचा मार्ग मला विविध पुस्तके आणि अन्य तज्ज्ञांकडून मिळविलेल्या ज्ञानाने होतो. या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात थोडेफार वेगळे कार्य केल्याचे मला समाधान आहे. मला अनेक कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. काही कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तूऐवजी पुस्तके मिळतात. ती पुस्तके घरी आणल्यानंतर माझ्यापेक्षाही पत्नी अनुराधा ही वाचून काढते आणि मला त्या पुस्तकांमधील सारांश सांगते. वयाची ८० वष्रे ओलांडल्यानंतर आमच्या दोघांमध्ये काय गप्पा होत असतील, असा प्रश्न कोणाला पडला तर त्याचे उत्तर सोपे आहे. घरी जी पुस्तके माझी पत्नी वाचते, त्यावर आम्ही एकत्र बसल्यावर चर्चा होते आणि त्यातील विचारांचे आदानप्रदान करीत आम्ही नव्या गोष्टी शिकत असतो. विविध निमित्ताने भारतातील सर्व प्रांतांसह आफ्रिकन देश, म्यानमार, बांगलादेश, थायलंड अशा ठिकाणी मी गेलो. तेथील लोकांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासोबत अनेक माहितीपर पुस्तकेही मिळविली. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट आणि गुगल सारखे महापुरुष असले, तरी पुस्तके व वाचनाचे महत्त्व जास्त आहे. वाचनातून प्रत्येक माणसामध्ये कळत-नकळत चांगले विचार रुजतात आणि संस्कार होतात. वाचनाने त्या विषयावर चिंतन होते. त्यातूनच खऱ्या अर्थाने विकास होतो. माझ्या जीवनप्रवासात जे काही वाचन केले, त्यातून मला माझी विकासाची दिशा मिळत गेली. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर याच अनुभवांचे सार ‘नियतीला घडविताना’ या पुस्तकातून लिहिण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक वेळी मिळालेल्या संधींचा योग्य वापर करून मी समाजासाठी काही ना काही करू शकलो. आई-वडिलांचे संस्कार आणि पुस्तकांचे मार्गदर्शन हेच त्यामागील गुरू होते. त्यामुळे वाचनाचे संस्कार स्वत:मध्ये रुजविण्याकरिता प्रत्येकाने वाचलेची पाहिजे.

First Published on October 13, 2017 3:40 am

Web Title: senior orthopedist dr kantilal hastimal sancheti bookshelf