06 July 2020

News Flash

ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे निधन

२०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद द. भि. कुलकर्णी यांनी भूषविले होते.

आस्वादक समीक्षेने साहित्यकृतीचे सौंदर्य उलगडणारे ज्येष्ठ समीक्षक, ललित लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. दत्तात्रय भिकाजी ऊर्फ द. भि. कुलकर्णी (वय ८१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा आणि नात असा परिवार आहे.
गेल्या दशकभरापासून दभि पुण्यामध्ये वास्तव्याला होते. नुकतेच पिंपरी-चिंचवड येथे झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ते सहभागी झाले होते. संमेलनामध्ये रविवारी (१७ जानेवारी) दम्याचा विकार असलेल्या दभिंना अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयातील प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. वयोमानामुळे प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. अखेरीस बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. २०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद द. भि. कुलकर्णी यांनी भूषविले होते. बदलापूर येथील ग्रंथसखा वाचनालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या मराठी स्वायत्त विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. द. भि. कुलकर्णी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दभिंच्या निधनामुळे मर्ढेकरांनंतरचा सक्षम समीक्षक गमावला, अशा शब्दांत साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांची समीक्षा सर्जनशील आणि आस्वादक तर होतीच. पण, सुरेश भट, ग्रेस, म. म. देशपांडे अशा अनेक तेव्हाच्या नवीन कवींच्या कवितांची समीक्षा केली. हे कवी प्रतिभासंपन्न होतेच. पण, दभिंनी आपल्या समीक्षेतून या कवींची समाजाला वेगळी ओळख करून दिली, असेही त्यांनी सांगितले.
साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांची स्वतंत्र समीक्षा करणारे दभि हे मराठीतील एकमेव समीक्षक आहेत. त्यांच्या समीक्षेने मर्ढेकरांचे मराठी साहित्यातील स्थान अधोरेखित केले, असे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सांगितले. साहित्य, संगीत, कला आणि संस्कृती यांचा मर्मग्राही समीक्षक असलेल्या दभिंनी कोणताही बाऊ न करता ज्योतिष विषयाचाही अभ्यास केला होता, असे डॉ. न. म. जोशी यांनी सांगितले.

सैद्धांतिक समीक्षेचे एकांडे शिलेदार
समीक्षेच्या प्रांतामध्ये आपली स्वतंत्र नाममुद्रा प्रस्थापित करणारे डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे सैद्धांतिक समीक्षेचे एकांडे शिलेदार असेच समर्पक वर्णन करावे लागेल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या काव्यापासून ते आधुनिक मराठी कवितेतील बा. सी. मर्ढेकर यांच्या काव्याची समीक्षा, कथा-कादंबरी-महाकाव्य या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप आणि समीक्षा असे मूलभूत स्वरूपाचे लेखन त्यांनी केले होते. मर्ढेकरांचे मराठी साहित्यातील स्थान अधोरेखित करण्याचे काम दभिंच्या समीक्षेने केले.
द. भि. कुलकर्णी यांचा जन्म २५ जुलै १९३४ रोजी झाला. नागपूर येथे शिक्षण घेतलेल्या दभिंनी १९६७ मध्ये ‘महाकाव्य’ विषय घेऊन पीएच. डी आणि विदर्भ साहित्य संघाची ‘साहित्य वाचस्पती’ ही डी. लिट समकक्ष पदवी संपादन केली. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विभागात प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले. काव्य आणि कथालेखनापासून लेखनाची सुरूवात करणारे दभि नंतर समीक्षेकडे वळाले. पाश्चात्त्य समीक्षेपेक्षा दभिंनी पौर्वात्य आणि संस्कृत साहित्यशास्त्र परंपरेची भूमिका ग्राह्य़ मानली. त्यामुळे समकालीन समीक्षकांपेक्षा त्यांची समीक्षा वेगळी, कलाकृतीचा मर्मग्राही वेध घेणारी आणि अभिजात रसिकतेची साक्ष पटविणारी आहे. ज्ञानेश्वर, मर्ढेकरपूर्व आधुनिक कविपरंपरा या विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘अमृताचा घनू’ कार्यक्रमात दभि ज्ञानेश्वरांच्या विराण्यांवर रसाळ निरुपण करीत असत. बदलापूर येथील पहिल्या मराठी स्वायत्त विद्यापीठाचे द. भि. कुलकर्णी कुलगुरु होते.
द. भि. कुलकर्णी यांची साहित्यसंपदा
कथासंग्रह – रेक्वियम,
कवितासंग्रह – मेरसोलचा सूर्य
ललित लेखसंग्रह – मेघ, मोर आणि मैथिली
समीक्षापर लेखन – दुसरी परंपरा, महाकाव्य : स्वरूप आणि समीक्षा, ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, पहिली परंपरा, तिसऱ्यांदा रणांगण, चार शोधनिबंध, पार्थिवतेचे उदयास्त, नाटय़वेध, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना, प्रतितिविश्रांती, दोन परंपरा, युगास्त्र, द्विदल, हिमवंतीची सरोवरे, पहिल्यांदा रणांगण, अपार्थिवाचे चांदणे, मर्ढेकरांची अनन्यता, पस्तुरी, कादंबरी : स्वरूप व समीक्षा, समीक्षेची सरहद्द, प्रतितिभेद, जीएंची महाकथा, समीक्षेची वल्कले, स्फटिकगृहीचे दीप, चौदावे रत्न
सहलेखन, संपादन – मराठी वाङ्मयाचा इतिहास : खंड चार, श्री. ना. रा. शेंडे : व्यक्ती आणि साधना, देवदास आणि कोसला (प्रा. मृणालिनी पाटील यांचा शोधनिबंध – मार्गदर्शन आणि संपादन), मराठी समीक्षा परिभाषा कोश, डॉ. अ. ना. देशपांडे स्मृतिग्रंथ, भारताचार्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2016 3:24 am

Web Title: senior reviewer db kulkarni passes away
टॅग Passes Away
Next Stories
1 बहुतांश स्कूल बस पुन्हा नियमबाह्य़तेच्या मार्गावर!
2 दुरुस्तीसाठी बोपखेलचा तरंगता पूल आता आठवडाभर बंद
3 चौथीच्या इतिहासाचे नवे पुस्तक
Just Now!
X