डॉ. बाबा आढाव यांचा सवाल

पुणे : भटक्या समाजाला गाव नाही तर पाणवठा कसा असणार? करोनाकाळात या लोकांचे सामाजिक आणि आर्थिक स्थान काय आहे? करोनावर लस येईल. पण, भारतातील जातिव्यवस्थेवर लस निघेल का? असे प्रश्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी रविवारी उपस्थित केले. आत्मनिर्भर भारतातील हे समाज आत्मनिर्भर कधी होणार, असेही ते म्हणाले.

भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, राष्ट्र सेवा दल, ऑर्गनायझेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, निर्माण पुणे यांच्यातर्फे आयोजित भटके विमुक्तांच्या प्रश्नांच्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन डॉ. आढाव यांच्या हस्ते झाले.

डॉ. आढाव म्हणाले, शोषित समाजातील शिकलेले लोक मध्यमवर्गासारखे वागू लागतात. समाज प्रगत व्हावा यासाठी ते मागे वळून पाहत नाहीत. आंबेडकरी, सत्यशोधक आणि भटके विमुक्तांच्या चळवळींना ठोस कार्यक्रम देण्यात आपण कमी पडलो आहोत. या चळवळींचे आज काय झाले, याचाही शोध घेतला पाहिजे.

एस. एम. जोशी फाउंडेशनचे सुभाष वारे  म्हणाले, सांस्कृतिक प्रतिमा ठळक करण्यासाठी सुरू केलेल्या अस्मितांच्या लढाया या शोषित समाजासाठी मारक ठरत आहेत.