राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे पाठोपाठ अन्य शहरांमधील करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. पुण्यात आज दिवसभरात करोनामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याने व २६८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.

शहरातील करोनाबाधितांची संख्या आता ८ हजार ७७७ झाली आहे. आज अखेर शहरात करोनामुळे ४१३  रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २०७ रुग्णांची  आज पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 5 हजार 782 रुग्ण करोनामुक्त झाल्याची नोंद झाली आहे.

पुणे शहाराबरोबच पिंपरी-चिंचवडमध्येही करोनाबाधित रुग्ण कमालीचे वाढत आहेत. आज शहरात नव्याने सर्वाधिक ८९ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर ६० वर्षीय महिलेचा आणि ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार १७ वर पोहचली आहे. दरम्यान, आज दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आणि हद्दी बाहेरील एकूण १०१७ जण करोना बाधित आहेत. पैकी, ५१६ हद्दीतील तर हद्दीबाहेरील ७५ जणांना करोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू करोना विषाणूमुळे झालेला आहे.