शाहीर हेमंत मावळे

देहू आणि आळंदीहून पंढरीला निघालेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम आणि संत श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या पालख्या गुरुवारी पुणे शहरात मुक्कामाला आहेत.

‘साधू-संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ हे शब्दश खरं वाटावं असं वातावरण पालख्यांच्या आगमनाच्या दरम्यान शहरात पाहायला मिळतं. ऊन, वारा, पाऊस यांची कुठलीही तमा न बाळगता मुखाने पांडुरंगाचा नामघोष करत पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास काहीसा सुखकर करावा, यासाठी काही ना काही छोटय़ा-मोठय़ा योगदानाची धडपड प्रत्येकाकडून केली जाते. पुणेकर दरवर्षी याबाबतीत उत्साहाने आघाडीवर असतात. वारीत दिसणारा सेवाभाव अनेकदा काळाबरोबर बदलतानाही दिसत आहे. त्याबाबत शाहीर आणि विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले हेमंत मावळे यांच्याशी साधलेला हा संवाद.

*     प्रश्न – वारीच्या काळातील सेवाभावाचा अनुभव कसा असतो?

उत्तर – पंढरपूरचा पांडुरंग हे लोकदैवत असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रत्येक वर्गातील व्यक्तीला अपरंपार प्रेम वाटतं. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या अनेक पिढय़ा दरवर्षी नित्यनेमाने, भक्तिभावाने, कुठल्याही आमंत्रणाशिवाय देहू-आळंदीला येतात आणि तेथून तुकोबा आणि ज्ञानेश्वर माउलींच्या बरोबर पंढरपूरला जायला निघतात. वारकरी पंढरपूरला जातात, तेव्हा ते पांडुरंगाला भेटायला जातात, ही भावना सर्वसामान्यांच्या मनात दृढ असते. या वारकऱ्यांबाबत प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात जिव्हाळा असतो. हा जिव्हाळा व्यक्त करण्याची पद्धत म्हणून वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न नागरिक मनोभावे करतात. सेवेचं स्वरूप काळाबरोबर बदलताना दिसतं, त्यातील सेवाभाव मात्र अद्यापही तोच आहे.

*     प्रश्न – सेवेचं स्वरूप बदललं म्हणजे नक्की काय बदल झाले?

उत्तर – देहू-आळंदीहून पालख्यांचं प्रस्थान होतं, तेव्हा नेमके किती वारकरी वारीत चालतात याचा अंदाज नसतो. अनेकदा कितीतरी वारकरी दिंडय़ांची व्यवस्था लावण्यासाठी, नियोजनासाठी पालखीच्या मार्गावर पुढे कार्यरत झालेले असतात. त्यामुळे वारीतील वारकऱ्यांची संख्या कधीही कमी होत नाही. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे, त्याच प्रमाणात नित्यनेमाने पंढरीची वारी करणारे वारकरी सुद्धा वाढताहेत, ही वस्तुस्थिती आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत येणाऱ्या वारकऱ्यांना जेवू-खाऊ घालणं ही वारकऱ्यांची सेवा होती आणि ती त्या काळाशी सुसंगत अशीच होती. आता मात्र आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढय़ा प्रकारच्या सेवा वारीसाठी उपलब्ध आहेत. पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण जाऊ शकत नाही, तर किमान जे जात आहेत, त्यांची सेवा तरी आपल्या हातून घडावी इतका साधा हेतू यामागे असतो.

 *     प्रश्न – वारकऱ्यांच्या सेवेसाठी नेमके काय काय उपक्रम शहरात चालतात?

उत्तर – वारकऱ्यांच्या सेवेसाठी अक्षरश अगणित उपक्रम शहरातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांतर्फे केले जातात. वारकऱ्यांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था केली जाते. रिक्षा चालकांपासून ते गृहनिर्माण संस्थांमध्ये राहाणारे नागरिक, आयटी कंपन्यांचे कर्मचारी, रुग्णालयं, गणेश मंडळं या सगळ्यांकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी काम केलं जातं. वारकऱ्यांची निवासाची सोय करणं, प्रवासात उपयोगी पडतील अशी औषधं पुरवणं, आठवडाभर पुरेल अशी खाऊ-बिस्किटांची शिदोरी देणं, पावसाळा आहे हे लक्षात ठेवून छत्र्या-रेनकोट देणं, पंचपक्वान्नांचं जेवण देणं हे उपक्रम अनेक वर्षे सुरू आहेत. अनेक कुटुंब, व्यक्ती, विविध व्यावसायिक वारी मार्गावर कडेला उभे राहून चहा-पाणी, बिस्किटं, उपवासाचे पदार्थ, प्लास्टिकचे कागद, टोप्या, पिशव्या यांचं वाटप करतात

*     प्रश्न – विविध ज्ञातीबांधवांकडून देखील सेवा म्हणून काही गोष्टी केल्या जातात, त्याबद्दल सांगा.

उत्तर – चर्मकार समाजातर्फे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी चरणसेवा केली जाते. वारीचा मुक्काम असेल त्या दोन दिवसांत दिंडींमधल्या वारकऱ्यांच्या तुटलेल्या चपला विनामूल्य शिवून देणं एवढी साधी पण अर्थपूर्ण कृती म्हणजे ही चरणसेवा. ही सेवा देणारे कारागीर दिवसाला कितीसे पैसे मिळवत असतील, पण वारीच्या काळात सेवा करायची म्हणून ते त्यावर पाणी सोडतात. नाभिक समाजातर्फे वारकऱ्यांसाठी विनामूल्य दाढी-केशकर्तन हा उपक्रम केला जातो. अनेक शेतकरी या कानाचे त्या कानाला न कळू देता दिंडींना धान्य देतात. अनेक जण कुणी न सांगताच वारकऱ्यांचे हात-पाय चेपून देतात. डोकं दाबून देतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. शिलाई काम करणारे व्यावसायिक कपडे शिवून देणं, छत्रीदुरुस्ती करणारे व्यावसायिक वारकऱ्यांच्या छत्र्या दुरुस्त करून देणं अशी कामं विनामूल्य करून देतात

*     प्रश्न – गणेशोत्सव मंडळांतर्फे कोणकोणते उपक्रम केले जातात?

उत्तर – गणेशोत्सव मंडळांतर्फे अनेक कामं होतात. पालखी मार्गावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव या सारखं मंडळ रुग्णवाहिकांची सेवा देतं. वारकऱ्यांसाठी औषधं पुरवणं, आरोग्य तपासणीसाठी शिबिरं घेणं, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणं अशा अनेक गोष्टी मंडळं करतात. स्वच्छता ही वारीच्या मार्गावरची प्राथमिक गरज आहे. ती ओळखून वारीच्या मार्गावर फिरती स्वच्छतागृह पुरवणं, त्यांची स्वच्छता राखणं अशा अनेक प्रकारातून गणेश मंडळं वारकऱ्यांच्या सेवेत आपलं योगदान देतात. कीर्तनसेवेतून वारकरी प्रबोधन या उपक्रमातही गणेशोत्सव मंडळांचा वाटा मोठा आहे.

*     प्रश्न – वारीतील सेवाभावाचं नेमकं गमक काय?

उत्तर – पांडुरंग या लोकदेवतेबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला कमालीचा जिव्हाळा, हे या सेवाभावाचं गमक आहे. सर्व जातिधर्मातील व्यक्तींना पांडुरंगाबद्दल ममत्व आहे. सर्व प्रकारचे मत आणि मनभेद पंढरीच्या वारीपाशी गळून पडतात. पांडुरंगाची भेट घेण्यासाठी वारी करणं आपल्याला शक्य नाही, तर किमान आपल्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी, ही भावना हेच यामागचं गमक आहे.

मुलाखत – भक्ती बिसुरे