महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांच्या बेळगावमधील मनगुत्ती या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हटविल्याप्रकरणी आज पुण्यात शिवनेच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. महात्मा फुले मंडई येथे शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी धनवडे म्हणाले, “कर्नाटक राज्याकडून आजवर आपल्या लोकांचा प्रत्येकवेळी अपमान करण्यात आला आहे. आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवून त्यांनी पुन्हा मराठी द्वेष दाखवून दिला आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तात्काळ बसवावा, अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच यावेळी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.