महापालिका प्रशासनाने शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार केलेल्या प्रारुप विकास आराखडय़ात अनेक चुका असून त्यांचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसणार आहे. या प्रकाराच्या विरोधात शिवसेना आवाज उठवणार असून आराखडय़ातील त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे सोमवारी (२६ मे) महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे आणि अजय भोसले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महापालिकेने तयार केलेल्या प्रारुप विकास आराखडय़ात पेठांमध्ये जी रस्तारुंदी प्रस्तावित करण्यात आली आहे, त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती आराखडय़ात नाही. कोणत्या रस्त्यावर किती मीटर रुंदी प्रस्तावित आहे, याची मोजमापे नागरिकांना समजणे आवश्यक होते. मात्र, ही माहिती मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून त्याबाबत सातत्याने विचारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
या मुख्य त्रुटीबरोबरच आराखडय़ात अनेक त्रुटी असून त्या दूर होणे आवश्यक आहे. यासाठी विकास आराखडय़ाच्या विरोधात शिवसेनेतर्फे सोमवारी (२६ मे) महापालिकेवर मोर्चा काढला जाईल. कसबा गणपतीपासून सकाळी अकरा वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.