अपत्य आपलं नाही असा दावा करीत दोन महिन्यांच्या बाळाला त्याच्या वडिलांनी नाकारल्याने आणि यावरुन सतत होणाऱ्या वादाला कंटाळलेल्या आईने त्याला रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकी येथील बसस्टॉप जवळ हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी या तान्ह्या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पती-पत्नीला बाळ झाल्याने त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. सर्व काही ठीकठाक सुरु असताना अचानक पती हे बाळ माझं नाही असे म्हणत पत्नीशी भांडू लागला. सततच्या होणार्‍या या भांडणाला कंटाळून अखेर त्या दोघांनी बाळाला सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खडकी येथील बसस्टॉप जवळ दोन महिन्यांच्या बाळाला त्याची आई रस्त्यावर सोडून गेली. एवढ्याशा बाळाला रस्त्यावर सोडून गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी काही तासांत बाळाच्या आई वडिलांचा छडा लावण्यात यश मिळवले.

खडकी येथील मेथलिक चर्च जवळील पीएमपीएमएल बस स्थानकजवळ फुटपाथवर नायलॉनच्या पिशवीत अंदाजे दोन ते तीन महिन्याचं बाळ रडताना नागरिकांनी पाहिलं याची माहिती त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्याच्या दृष्टीने बाळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. काहींनी बाळाच्या फोटोचे स्टेटस देखील ठेवले. बाळ लहान असल्याने त्याची प्रकृती लक्षात घेता, ससून येथील एका संस्थेत त्याला दाखल करण्यात आले. तोवर अनेकांपर्यंत हा फोटो पोहोचला होता.

दरम्यान, एकाने हे बाळ ओळखीच्या कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार संबधित कुटुंबाकडे जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता ते बाळा आमचेच असल्याची कबुली या कुटुंबानं दिली. बाळ रस्त्यावर सोडण्यामागील कारण विचारले असता, बाळाच्या आईने सांगितले की, “हे बाळ माझं नाही, असं पती वारंवार म्हणत आहे. यावरून आमच्या दोघात अनेकदा वादही झाले. त्यामुळे आम्ही दोघांनी बाळाला सोडून देण्याचा निर्णय घेतला.”