एल्गार परिषद प्रकरण तसेच भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या सहाजणांचे जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी बुधवारी फेटाळून लावले.

सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, शोमा सेन, रोना विल्सन, वरावरा राव अशी जामीन अर्ज फेटाळलेल्या संशयितांची नावे आहेत. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अटकेत असलेले संशयित बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंधित असून लोकशाहीसाठी हे धोकादायक असल्याचे न्यायालयाने जामीन फेटाळताना नमूद केले. या प्रकरणात गडलिंग, ढवळे, राऊत, सेन, विल्सन, राव यांनी जामीन मिळवण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. बचाव पक्षाकडून या प्रकरणात बाजू मांडण्यात आली होती. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उज्वला पवार यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली होती.

या प्रकरणातील संशयित बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी संबंधित आहेत. राऊत यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रात भीमा-कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणाचा उल्लेख आहे. विल्सन यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रात शस्त्र खरेदीचा उल्लेख आढळून आला आहे. आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी पहाडसिंग याने दिलेल्या जबाबात संशयित आरोपींच्या कामाबाबतची माहिती देण्यात आली आहे. राव यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रात नक्षलवादी संघटनेच्या ध्येयधोरणांबाबत उल्लेख आढळून आला आहे. शहरी भागात नक्षलवादी विचारधारेचा प्रसार करण्याचे काम ते करत होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून या बाबी सिद्ध झाल्या असल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रक रणाची पुढील सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वेरानोन गोन्सालिव्हज यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाकडून त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. दरम्यान, राव यांचा बुधवारी वाढदिवस असल्याने त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी न्यायालयात आले होते.