News Flash

स्मार्ट सिटी म्हणजे काय होणार, याचे उत्तर मिळणार..

प्रभाग ६७ मध्ये विविध संकल्पना राबवण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुणे स्मार्ट सिटी होणार म्हणजे नक्की काय होणार, स्मार्ट सिटीमध्ये माझ्यासाठी काय असेल, आमच्या प्रभागात स्मार्ट सिटी अभियानात महापालिका काय करणार आहे.. असे अनेक प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारले जात असून या प्रश्नांना कृतिरूप उत्तर लवकरच मिळणार आहे. स्मार्ट सिटीसाठीचे मॉडेल एका प्रभागात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या प्रभागात ज्या अनेकविध स्मार्ट सेवा-सुविधा नागरिकांना दिल्या जाणार आहेत त्यातून स्मार्ट सिटीची संकल्पना नागरिकांना समजणार आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाची चर्चा सध्या जोरात आहे. विशेषत: देशातील ९८ शहरांमधून पहिल्या वर्षी ज्या दहा किंवा वीस शहरांची निवड होणार आहे त्यात पुण्याची निवड व्हावी यासाठीही महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांकडून जोरात प्रयत्न सुरू आहेत. मात्र स्मार्ट सिटी म्हणजे शहरात काय बदल होणार आहेत किंवा संकल्पना काय आहे याची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे नागरिकांकडून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर स्मार्ट या संकल्पनेवर आधारित एक वॉर्ड तयार केला जाईल. प्रभाग क्रमांक ६७ मध्ये हे काम सुरू झाले आहे.
महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा नागरिकांना जलदगतीने, तसेच कोणताही वेळ खर्च न करता आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, त्यासाठी मोबाईल अॅप उपलब्ध असावीत, सर्व सेवा सहजगत्या उपलब्ध होण्यासाठी जागोजागी किऑस्क उपलब्ध असावीत, प्रभागातील विविध सेवांची माहिती नागरिकांना मोबाईल वा अन्य माध्यमातून वेळोवेळी दिली जावी, सर्व प्रकारची बिले एकाच ठिकाणी भरण्याची सुविधा असावी आदी अनेक संकल्पना स्मार्ट सिटी अभियानात राबवल्या जाणार आहेत. हा आराखडा तयार करण्याचे काम माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आणि अनुभवी सल्लागार प्रमोद गुर्जर यांनी केले असून त्यांनी केलेल्या आराखडय़ानुसार प्रभाग ६७ मध्ये विविध संकल्पना राबवण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महापालिकेच्या अंदाजपत्रकातून केला जाईल, अशी माहिती उपमहापौर आबा बागूल यांनी दिली. या प्रकल्पाचे सादरीकरण आयुक्तांपुढे झाले असून सोमवारी पुन्हा सादरीकरण व तज्ज्ञांबरोबर चर्चा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जोवर तुम्ही नागरिकांना काहीतरी कृती करून दाखवत नाही, त्यांना प्रभागात काही बदल दिसत नाही तोवर नागरिकांना कोणत्याच संकल्पनेबाबत काहीच माहिती होत नाही. नागरिकांना प्रत्यक्ष काहीतरी दाखवावे लागते. त्यासाठी एका प्रभागाचा विचार करून त्या प्रभागात काही स्मार्ट बदल करून दाखवता येतील का असा विचार केला. या संकल्पनेवर गेले सहा महिने काम करत होतो आणि त्यातून आता एका प्रभागाचा स्मार्ट आराखडा तयार झाला आहे. त्यातून नागरिकांना निश्चितच स्मार्ट सिटी ही संकल्पना लक्षात येईल, असा विश्वास आहे.
प्रमोद गुर्जर, प्रकल्प सल्लागार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 3:20 am

Web Title: smart city project layout
Next Stories
1 विसर्जन मिरवणुकीत वीज यंत्रणेपासून राहा सतर्क!
2 जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे आरक्षित जागांवरील प्रवेशाचा खोळंबा
3 सोमवारचे चंद्रग्रहण महाराष्ट्र-कर्नाटकात दिसणार नाही
Just Now!
X