सायकल अनलॉक राहिल्यामुळे दोन दिवस रिक्षाच्या मीटरप्रमाणे शुल्कआकारणी

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागात सुरु करण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या भाडेतत्त्वावरील सायकल योजनेतील तांत्रिक धोके पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. तांत्रिक चुकीमुळे सायकल अनलॉक राहिल्यामुळे तब्बल दोन दिवस रिक्षाच्या मीटर प्रमाणे शुल्क आकारणी सुरू राहिल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी ठोस यंत्रणा नसल्यामुळे मनस्तापही सहन करावा लागत असून पेटीएम खात्यातील पैसेही गमविण्याची वेळ येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सायकलींचे शहर अशी शहराची ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेकडून भाडेतत्त्वावरील सायकल योजनेला प्रारंभ करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीपर्यंत केवळ औंध आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरापुरती मर्यादित असलेली सुविधा अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि शहराच्या अन्य भागातही तिचा विस्तार करण्यात आला. पेडल झूमकार या कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रशासनाकडून ही सेवा अत्यंत कमी शुल्कात उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण तांत्रिक  बिघाडामुळे सायकल अनलॉक केल्यानंतरही शुल्क आकारणी होत असल्याचा प्रकार अमित उजागरे या तरूणासंदर्भात घडला आहे. त्याबाबतची माहिती त्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाशेजारील सायकल थांब्यावरून त्याने शुक्रवारी रात्री सायकल घेतली. एका कामासाठी तो सायकलवरून डेक्कनकडे निघाला. काम झाल्यानंतर अध्र्या तासाने त्याने सायकल परत संभाजी उद्यानाशेजारील थांब्यावर आणली आणि मोबाईलच्या साहाय्याने ती लॉक केली. पण त्यानंतरही त्याच्या पेटीएमच्या खात्यातून पैसे जात असल्याचे निदर्शनास आले. एण्डट्रिप झाली नसल्याचे कारण संबंधित सायकलच्या अ‍ॅपवर असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. मात्र मोबाईल अ‍ॅपवर रिक्षाप्रमाणे शुल्क आकारणी होत असल्यामुळे पेटीएम खात्यातील आऊटस्टंॅडिंगची रक्कमही वाढत गेली. त्यामुळे संबंधित कंपनीकडे तक्रार करण्याचा प्रयत्न  त्याने केला. पण टोलफ्री क्रमांक किंवा अन्य कोणतीही यंत्रणा आढळून आली नाही. अ‍ॅपवर असलेल्या संकेतस्थळावर त्याने तक्रार दिली, पण दोन दिवसानंतरही त्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

या दरम्यान सायकलची एण्ड ट्रिप न झाल्यामुळे ही सायकल अन्य दुसऱ्या सायकलस्वाराला विनासायास आणि विनामूल्य वापरण्यास मिळाली. कंपनीकडे तक्रार केल्यानंतर सायकल आणि तिचा क्रमांक सापडला पण ती कोणी वापरली हे स्पष्ट होऊ शकले नाही, असे अमित याने सांगितले. दरम्यान, हे पैसे रिफंड व्हावेत यासाठीही त्याने प्रयत्न केले, मात्र अद्यापही ते पैसे त्याच्या

खात्यात जमा झालेले नाहीत. मात्र सायकलचा अतिरिक्त वापर केल्याप्रकरणी ३५ रुपये त्याच्याकडेच बाकी असल्याचे अ‍ॅपवरून स्पष्ट दिसून येत आहे.

मोबाइलवर संदेश देणार

यासंदर्भात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहराच्या काही भागात ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली आहे. त्यातून लक्षात येत असलेल्या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न होत आहेत. यापुढे सायकलचा तीन तासांहून अधिक वापर झालेला असेल तर संबंधित सायकलस्वाराला मोबाइलच्या माध्यमातून संदेश देण्याची योजना विचाराधीन आहे.