25 September 2020

News Flash

तिमिरातून तेजाकडे नेणारा एका अवलियाचा ‘दिशादर्शक’ प्रवास!

अंध असूनही क्रिकेटर ते ससून रुग्णालयातील टेलिफोन ऑपरेटर वाटचाल

रवि वाघ

कोणतेही यश मिळवायचे असेल, तर त्यासाठी जिद्द हवी. जिद्द असल्यावर निसर्गनिर्मित अडथळेही दूर होतात. हातापायांनी धडधाकट असलेली माणसेही अनेकवेळा निराश होतात. आपल्याला नशिबाची आणि दैवाची साथ नसल्यामुळेच सतत अपयश येत असल्याचे रडगाणे गातात. जिद्द आणि निर्धार गमावलेली अशी माणसे जीवनात काहीही करू शकत नाहीत. अपयशाने ती खचतात आणि नशिबालाच दोष देत बसतात. पण परिस्थितीपुढे मान न तुकवता आलेल्या आव्हानांचा सामना करण्याची एक अवलिया व्यक्तिमत्त्वाची आज आपल्याला ओळख करून द्यायची आहे. रवी वाघ असे या अवलियाचे नाव. रवि वाघ यांना जन्मतः अंधत्व आलेले असतानाही कधीच त्या बदल मनात दुःख बाळगले नाही. ते सात्यत्याने पुढे जात राहिले. अशा व्यक्तीने समाजापुढे खूप सुंदर उदाहरण ठेवले आहे. क्रिकेटर ते ससून रुग्णालयातील टेलिफोन ऑपरेटर हा प्रवास करत त्यांनी सर्वांनाच थक्क केलंय.

पुण्यातील भवानी पेठेत रवि वाघ यांचा सामान्य कुटुंबांत २६ डिसेंबर १९७३ रोजी जन्म झाला. ते सर्वात लहान. घरात त्यांच्यासह चार भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार होता. ते जन्मत: अंध आहेत. त्यांना लहानपणापासून क्रिकेटची विशेष आवड. त्यांची ही आवड लक्षात घेता त्याना त्यांच्या भावंडांनी क्रिकेट शिकवले. त्यावेळेस कपिल देव आणि सुनील गावसकर यांच्यासारखे महान क्रिकेटर मैदानावर खेळत होते. ते फलंदाजी किंवा गोलंदाजी कशी करतात. हे कानावर पडत होते. त्यामुळे पुढे जाऊन क्रिकेटर व्हायचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करायचे, असा निश्चिय त्यांनी केला. मात्र, अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यामध्ये देखील कायम हुशार होतो. पुणे विद्यापीठातून एम.ए. केले. मात्र तोपर्यंत काही संघर्ष संपत नव्हता. रवि वाघ म्हणतात, येणाऱ्या समस्येला सामोरे जाण्यासाठी अनेक ठिकाणी काम करीत शहर पातळी ते आंतरराष्ट्रीय सामनेही मी खेळलो. तसेच भारतीय अंध क्रिकेट टीमचा सदस्य देखील झालो आणि तिथे चमकदार कामगिरी केली. यानंतर अनेक ठिकाणी काम केल्यानंतर ससून रुग्णालयात २००८ ला रुजू झालो. तेव्हापासून आजपर्यंत टेलिफोन ऑपरेटिंगचे काम करतो आहे.

टेलिफोन ऑपरेटिंगच्या कामात वेगळे समाधान मिळते. अनेक जणाच्या विविध समस्या असतात. फोनच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला संबंधित डॉक्टरपर्यंत पोहोचविता येते. तसेच दररोज साधारण एक हजाराहून अधिक फोन येतात आणि त्या व्यक्तीशी संवाद साधला जातो. या कामामध्ये ऑफिसमधील सर्वजण सहकार्य करतात. यापुढील काळात देखील समाजातील विविध क्षेत्रांत काम करण्याचा निश्चिय केला असल्याचे रवि वाघ यांनी सांगितले. रवि वाघ यांच्या पत्नी संजिवनीही अंध असून, त्या येरवड्यातील शासकीय अपंग केंद्रात शिक्षिका म्हणून काम करतात. त्याना राज्य सरकारमार्फत आदर्श शिक्षिका या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना एक मुलगा असून तो सध्या आठवीमध्ये शिकत असून, त्याला फुटबॉलची आवड आहे. तो या खेळामध्ये कसा पुढे जाईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. हा सर्व अनुभव सांगत असताना त्यांच्या समोरील फोन वाजत होते. प्रत्येक फोन उचलून कोणत्या डॉक्टराचा नंबर समोरच्या व्यक्तीला क्षणाचाही विलंब न लावता सांगत होते. कोणत्याही व्यक्तीवर न चिडता आणि ताण न घेता माहिती देत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 3:45 pm

Web Title: social hero ravi wagh pune blind person cricketer telephone operator
Next Stories
1 दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवणारे काही जण भाजपसोबत: शिवसेना
2 नगरसेवक सापडले!; बॅनरबाजीतून पुणेरी ‘टोला’
3 फडणवीसांच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या; बापटांची जीभ घसरली
Just Now!
X