‘ओळखलत का सर मला पावसात आला कुणी’, ‘नव लाख तळपती दीप विजेचे येथ’, ‘उगवतीचे ऊन आता मावळतीकडे पोहोचले आहे’ या कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचा प्रतिमांसह अर्थ उलगडत गेला आणि प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या चिंतनात्मक निरुपणातून सुंदर मैफलीची अनुभूती शुक्रवारी रसिकांना आली.
रसिक मित्र मंडळातर्फे ‘एक कवी एक भाषा’ व्याख्यानमालेअंतर्गत कवी कुसुमाग्रज या विषयावर अरुणा ढेरे यांचे व्याख्यान झाले. ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले, मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला आणि गजलकार प्रदीप निफाडकर या वेळी उपस्थित होते.
एरवी कवी हा माणूसच असतो. तीव्र संवेदनशीलता आणि प्रतिभाशक्ती कवीला माणसापासून वेगळे करते. वेगळं दिसणं आणि वेगळं ऐकू येणं ही सर्जनशीलता. भूतकाळाकडे पाहणं आणि भविष्याचा वेध घेण्याचे सामथ्र्य कुसुमाग्रजांच्या कवितांमध्ये जाणवते. एका अर्थाने त्यांना कालस्वर सापडला होता, असे सांगून अरुणा ढेरे म्हणाल्या, त्यांची कविता जशी स्वातंत्र्यप्राप्तीच्या आकांक्षा निर्माण करते तशीच ती स्वातंत्र्योत्तर काळातील मूल्य ऱ्हासाबद्दलचा खेद आणि अस्वस्थता व्यक्त करते. ‘कणा’ या कवितेमध्ये आयुष्याला आधार देण्याचे बळ सामावले आहे.
सकारात्मकता हा कुसुमाग्रजांच्या कवितेचा निजगुण असून तिमिरातूनी तेजाकडे हे अंत:सूत्र आहे. स्वत:ला शब्दांमध्ये मागे ठेवणे आणि त्या शब्दांतूनच जगणे हे गुण त्यांच्या कवितेने सहज साध्य केले आहेत. कवितेतील मौन, रिकाम्या ओळी जिवंत करण्याचे काम त्यांच्या कवितेने केले. कवीची आयुष्याकडे, कवितेकडे, अनुभवाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते आणि अभिव्यक्तीची तऱ्हादेखील वेगळी असते याची प्रचिती या कवितांतून जाणवते. ही कविता आपल्याला जाणिवेकडून नेणिवेकडे नेते, असेही ढेरे यांनी सांगितले. सुरतवाला यांनी प्रास्ताविकामध्ये मंडळाच्या कार्याची माहिती दिली.