दहावीच्या मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (२५ ऑगस्ट) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. गुणपत्रकांचे वाटप ३१ ऑगस्टला होणार असून, त्यानंतर लगेचच या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्याची सूचना शासनाने दिली आहे.
राज्यमंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी मार्च आणि ऑक्टोबर अशा दोन परीक्षा होत होत्या. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ऑक्टोबरऐवजी जुलैमध्ये परीक्षा घेण्यात आली. यावर्षी पहिल्यांदाच जुलैमध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे त्याबाबत अधिक उत्सुकता आहे. परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप ३१ ऑगस्टला दुपारी ३ वाजता शाळांमध्ये करण्यात येणार आहे.
(संग्रहित छायाचित्र)