प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका; पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन

मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून धावत्या रेल्वे गाडय़ांवर दगड फेकण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रकारांमुळे रेल्वे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असले, तरी नागरिकांनीही असे प्रकार करणाऱ्यांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. लोहमार्गालगत राहणाऱ्या काही उपद्रवी लोकांकडून असे प्रकार केले जात असल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे.

धावत्या रेल्वे गाडय़ांच्या डब्यावर किंवा इंजिनवर अंधारातून दगड फेकून मारण्याच्या घटना पुणे विभागातील विविध मार्गावर सातत्याने घडल्या आहेत. यापूर्वीच्या काही घटनांमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना गंभीर इजाही झाल्या आहेत. अलीकडेच घडलेल्या एका घटनेमध्ये मैसूर- अजमेर एक्स्प्रेसवर लोणंद- मीरा स्थानकाच्या दरम्यान काही अज्ञातांनी दगड फेकून मारले. त्यात इंजिनची काच फूटून ती चालकाच्या डोक्याला लागली. त्यात तो  गंभीररीत्या जखमी झाला. फुरसुंगी स्थानकाजवळ बंगळुरू- गांधीधाम एक्स्प्रेसवरही काही दिवसांपूर्वी दगड फेकण्यात आले. त्यातही चालकाच्या डोळ्याला इजा झाली. सासवड ते घोरपडी स्थानकादरम्यान रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण झालेल्या भागात तिरुनवेल्ली- दादर एक्स्प्रेसवर अज्ञात लोकांनी डबे आणि इंजिनवर दगड फेकले.

धावत्या गाडय़ांवर दगड फेकण्याचे वाढते प्रकार लक्षात घेऊन रेल्वे पोलीस दलाने कंबर कसली असून, सातत्याने काही भागांवर नजर ठेवली जात आहे. लोहमार्गालगतच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्याबाबत माहिती दिली जात आहे. त्याचप्रमाणे लोहमार्गावर गाडय़ांच्या वाहतुकीला अडथळा होईल, अशी कोणतीही वस्तू न ठेवण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.

या घटनांमध्ये कोणी सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात येत आहे. शाळांमध्ये जाऊनही याबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून लोहमार्गालगत गस्त वाढविण्यात आली आहे.

मात्र, हे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांकडूनही सहकार्य अपेक्षित असल्याने अशा प्रकारात सहभागी असणाऱ्यांची नावे नागरिकांनी पोलिसांना कळवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जन्मठेप किंवा दहा वर्षांची सक्तमजुरी

रेल्वे गाडय़ांवर दगड फेकण्याच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्यांना रेल्वे अधिनियम १५२ नुसार अटक केली जाऊ शकते. त्यानुसार आरोपीला जन्मठेप किंवा दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे रेल्वेच्या हद्दीमध्ये अनधिकृत प्रवेश आणि गुन्ह्यसाठी सहा महिन्याची शिक्षा किंवा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षाही केली जाऊ शकते.