िपपरी पालिकेतील उधळपट्टी सुरुच

िपपरी महापालिकेचे नवे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासाठी १२ लाख रुपये खर्च करून नवीन आलिशान मोटार खरेदी करण्याचा प्रस्ताव ऐनवेळी दाखल करून तो मंजूर करून घेतल्यानंतर त्याच पद्धतीने व तितक्याच खर्चाची नवीन मोटार अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांच्यासाठीही खरेदी करण्यावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे िशदे बदलीच्या वाटेवर असताना त्यांच्यासाठी मोटार खरेदी करण्यात येत आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या खर्चाने नगरसेवकांच्या ‘अभ्यास’ दौऱ्याचे सत्र िपपरीत सुरूच आहे. आता शहर सुधारणा समितीचे सदस्य म्हैसूर व बंगळुरूला जाणार असून, त्यासाठी सात लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

स्थायी समितीच्या गेल्या सभेत आयुक्तांसाठी नवीन मोटार खरेदी करण्याचा प्रस्ताव ऐनवेळी मांडून कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आला. आयुक्तांची सध्याची मोटार १० वर्षे जुनी असल्याने त्यांना नव्या मोटारीची गरज आहे. त्यानुसार, टोयाटो कंपनीचे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी १२ लाख खर्च करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासाठी कोणतीही निविदा मागवण्याची तसेच करारनामा करण्याची आवश्यकता नसल्याचे स्थायी समितीने स्पष्ट केले होते. अगदी त्याच पद्धतीने अतिरिक्त आयुक्तांच्या मोटारीचा विषय मंजूर करण्यात आला आहे. शिंदे यांना िपपरी महापालिकेत साडेतीन वर्षे होत आली आहेत. ते बदलीच्या मार्गावर असताना त्यांच्यासाठी नवीन मोटार खरेदी करण्यात आल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महापौरांचा सिक्कीम दौरा, पुन्हा पक्षनेत्यांचा सिक्कीम दौरा, महिला बालकल्याण समितीचा केरळ दौरा, महापौर-उपमहापौरांचा जर्मन दौरा असे अभ्यास दौऱ्यांचे सत्र कायम सुरू आहे. अभ्यासाच्या नावाखाली होणाऱ्या सहलींसाठी पालिकेचे लाखो रुपये खर्च होत आहेत. त्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी टीकेचे लक्ष्य होत असतानाही दौऱ्यांचा सोस थांबण्याची चिन्हे नाहीत. शहर सुधारणा समितीचे नगरसेवक ‘गलिच्छ वस्ती निर्मूलन’ कामाचा ‘अभ्यास’ करण्यासाठी म्हैसूर व बंगळुरूला जात आहेत. ऐन पावसाळय़ात होणाऱ्या या दौऱ्यासाठी सात लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.