सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाच्या आता चारऐवजी तीन फेऱ्या होणार आहेत. न्यायालयाचा हा आदेश अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही लागू असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण (फार्मसी), वास्तुशास्त्र (आर्किटेक्चर), व्यवस्थापन (एमबीए) या व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये एक ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी अभियांत्रिकी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे १५ जुलै रोजी पहिली फेरी, २२ जुलैला दुसरी फेरी आणि २९ जुलै रोजी तिसरी समुपदेशनाची फेरी होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतील एक फेरी कमी झाली असून त्याविषयीचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे. शासकीय तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे यासंदर्भात अधिसूचना जारी केली जाणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
तीन खासगी विद्यापीठांना लवकरच मंजुरी
राज्य सरकारने स्पायसर आणि अॅमिटी या दोन खासगी विद्यापीठांना नुकतीच मान्यता दिली असून लवकरच आणखी तीन खासगी विद्यापीठांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. अिजक्य, एमआयटी आणि पनवेल येथील एका संस्थेला खासगी विद्यापीठाचा दर्जा दिला जाणार आहे. खासगी विद्यापीठांसाठी स्वतंत्र कायदे करून मंजुरी देण्यात आली असून या तीन खासगी विद्यापीठांसाठी लवकरच अध्यादेश काढला जाणार आहे. खासगी विद्यापीठांसाठी राज्यभरातून २२ प्रस्ताव आले होते. त्यापैकी १७ ठिकाणांची निवड करण्यात आली असून ११ स्थळांची पाहणी करण्यात आली आहे. विद्यापीठ कायद्यातील बदल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. अनिल काकोडकर, डॉ. राम ताकवले आणि डॉ. अरुण निगवेकर यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली तर, हा कायदा लवकरच अस्तित्वात येऊ शकेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.