News Flash

भाजपला हिटलर राज्य निर्माण करायचे आहे -सुशीलकुमार शिंदे

केवळ राज ठाकरे म्हणतात म्हणून सोडून देण्यापेक्षाही सगळ्यांना हवे म्हणून जगाला दिपवून टाकणारे स्मारक झाले पाहिजे, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

भाजपला हिटलर राज्य निर्माण करायचे आहे -सुशीलकुमार शिंदे

गुजरातमधील पाटीदार समाजाचे आणि हरियानातील जाट समाजाचे आंदोलन, जम्मूमध्ये ‘हाय अॅलर्ट’ असताना होणारा गोळीबार या घटना पाहता देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत केंद्र सरकार बेफिकीर आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना विरोध करताना दहशतवादाचा अवलंब करून भाजपला देशामध्ये हिटलर राज्य निर्माण करायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सत्कार कार्यक्रमासाठी शिंदे पुण्यामध्ये आले होते. कार्यक्रमानंतर काँग्रेस भवन येथे शिंदे यांची पत्रकार परिषद झाली. शिंदे म्हणाले,‘‘ दोन वर्षांपूर्वी राक्षसी बहुमत घेऊन सत्तेवर आलेले नवे सरकार चांगले काम करेल अशी अपेक्षा होती. मात्र, देशाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात सरकारला अपयश आले आहे. विकास दर वाढल्याचा दावा केला जात असला तरी तसे चित्र दिसत नाही. गुजरात आणि हरियाना या भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्येच आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री शक्तिशाली असतानाही ही आंदोलने थोपविण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले ही सरकारची नामुष्की आहे. मुंबईमध्ये बाँबस्फोट झाले तेव्हा आम्ही लष्कराला बोलावले नव्हते. आंतरराज्यीय शांतता पाळण्याचे काम केंद्र सरकारचे असून त्यामध्ये सरकार निकामी ठरले आहे.’’
दलित विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी राहुल गांधी तेथे गेले असता भाजप मंत्र्याच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आली. जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये प्रश्न समजून घेण्यासाठी ते गेले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. विरोधी पक्षाबाबत सूडाचे राजकारण करण्याचे काम सुरू असून काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला. डाव्या पक्षांच्या ताब्यात असलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये अभाविपची शाखा सुरू करण्याचे काम भाजपनेच थांबविले पाहिजे, असेही ते म्हणाले.
इशरत जहाँचे प्रकरण माझ्याकडे कधीच आले नाही. त्यामुळे ‘माहिती देऊ नका’ असे अहमद पटेल माझ्याशी कधी बोललेच नाहीत. यासंदर्भात आलेली माहिती ही पूर्णपणे असत्य असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या धर्तीवर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी संकल्पना असून केवळ राज ठाकरे म्हणतात म्हणून सोडून देण्यापेक्षाही सगळ्यांना हवे म्हणून जगाला दिपवून टाकणारे स्मारक झाले पाहिजे, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2016 3:23 am

Web Title: sushilkumar shinde slams raj thackrey and bjp
टॅग : Sushilkumar Shinde
Next Stories
1 शिवरायांचे पुतळे आणि स्मारक करण्यापेक्षा गडकोट-किल्ल्यांचे जतन करा- राज ठाकरे
2 पुण्याचा कचरा मोशीत टाकण्यास विरोध; ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
3 संगणक अभियंत्याकडून खंडणी उकळणारे पोलीस शिपाई गजाआड
Just Now!
X