स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे २४ ठिकाणी समृद्धी वर्ग

वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांवर संस्कार करत त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्यात उत्तम प्रकारे केले जात आहे. हातावर पोट असल्यामुळे दररोज कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या अशिक्षित पालकांना मुले वाईट संगत लागून बिघडतील याची चिंता या वर्गामुळे भेडसावत नाही. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलापासून ते नांदेड सिटीपर्यंत १९ आणि कर्वेनगर परिसरात पाच अशा २४ ठिकाणी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते समृद्धी वर्गाच्या माध्यमातून भावी पिढी संस्कारित होईल यासाठी झटत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती  व्याख्यानमालेच्या माध्यमातून सुरू झालेल्या स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे कार्य समाजाभिमुख झाले आहे.

केवळ व्याख्यानमालेपुरतेच मर्यादित न राहता विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिला आणि मुलांना कार्यप्रवण कसे ठेवता येईल याचा विचार सुरू झाला त्यातून दर शनिवार-रविवार मुलांसाठी समृद्धी वर्ग, महिलांसाठी कापडी आणि कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण वर्ग, युवा मुलांसाठी किशोर दर्पण तसेच विविध वस्त्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व अशा चार स्तरांवर प्रतिष्ठानचे कार्य सुरू करण्यात आले, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र शिंगणापूरकर आणि विक्रम पानसे यांनी दिली.

सिंहगड रस्ता परिसरातील समस्या समजून घेण्यासाठी २०१६ मध्ये अनेक सेवावस्त्यांचे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि रोजगार या विषयांवर सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातील समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी वस्त्यांमधे समृद्धीवर्ग चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ४ जून २०१६ रोजी गणेशमळा येथे पहिला वर्ग सुरू झाला.

सपहिल्या वर्षी सहा वस्त्यांमध्ये सुरू झालेल्या वर्गाचा अनुभव ध्यानात घेता अन्य वस्त्यांमधून हा वर्ग चालवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दर शनिवार-रविवार वस्त्यांमधील देवळात, समाज मंदिरामध्ये, एखाद्या भाडे तत्त्वावरील जागेत किंवा अंगणवाडीच्या ठिकाणी हे वर्ग भरतात. ४ ते १२ वयोगटासाठीच्या वर्गात प्रार्थना, थोर पुरुष-वैज्ञानिकांच्या कथा, वेगवेगळे सांघिक खेळ असे कार्यक्रम होतात तसेच शाळेत न समजलेला अभ्यास अभ्यासिकेमधून घेतला जातो. रोप कसे लावतात यापासून ते घरातील अनेक छोटय़ा गोष्टीत विज्ञान कसे काम करते हे शिकवले जाते, अशीही माहिती शिंगणापूरकर यांनी दिली.

किशोरवयीन मुला-मुलींना उमलत्या वयाची जाण करून देण्यासाठी ‘किशोर दर्पण’ उपक्रम सध्या निवडक चार वस्त्यांमध्ये सुरू केला आहे.

या वयातील मुला-मुलींमधील शारीरिक आणि मानसिक परिवर्तन हे सकारात्मक असावे तसेच कोणत्याही प्रसंगी आत्मविश्वास ढळू न देण्याविषयी मानसशास्त्रतज्ज्ञ कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन करतात. काही वस्त्यांमध्ये नियमित आरोग्य केंद्र, तर काही वस्त्यांमध्ये आरोग्य शिबिरे घेतली जातात.

विशेष गंभीर आजार आढळल्यास त्याचा योग्य औषधोपचार करण्याची व्यवस्था केली जाते, असेही शिंगणापूरकर यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणाचा प्रयोग

वस्तीतील महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात या हेतूने सध्या तीन-चार वस्त्यांमध्ये कापडी आणि कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या महिलांमधील बारावी उत्तीर्ण झालेल्या दोन महिलांना शिक्षक करण्यात आले असून त्यांच्यामार्फत हे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना मानधन दिले जाते. महिला सक्षमीकरणाच्या या प्रयोगाला चांगले यश लाभत आहे.