स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले; रुग्णांच्या नातलगांची फरपट

शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णामध्ये वाढ झाल्याने शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत. परिणामी स्वाइन फ्लूसह इतर रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने नातलगांची फरपट होत असून, रुग्णालयांवरही ताण येत आहे.

अतिदक्षता विभागाची सुविधा असलेल्या शहरातील जवळपास सर्वच रुग्णालयांमध्ये सध्या स्वाइन फ्लूचे रुग्ण उपचार घेत आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात या वर्षांतील सर्वाधिक म्हणजे तब्बल एकशे अठ्ठय़ांऐंशी रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली.

वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे स्वाइन फ्लूच्या संसर्गासाठी पोषक वातावरण असल्याने ऑक्टोबर महिन्यात सुरू होताच स्वाइन फ्लूचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. पाच ऑक्टोबरला पुणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार ५४२१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागामध्ये काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील सर्वच जागांवर रुग्ण उपचार घेत असल्याची सद्य:स्थिती आहे. गोखले नगर परिसरातील एका सत्तर वर्षीय महिलेच्या नातलगांनी शनिवारी याबाबतची फरपट अनुभवली. या महिलेला  शनिवारी फग्र्युसन रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवून देण्यात आले. मात्र, पहाटे पाच वाजेपर्यंत कोणत्याही रुग्णालयात त्यांच्यासाठी अतिदक्षता विभागात जागा मिळू शकली नाही. महिलेच्या नातलगांनी सांगितले, की स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समजल्यानंतर आम्ही इतर रुग्णालयांत अतिदक्षता विभागांची माहिती घेतली. दुसऱ्या दिवसापर्यंत कुठेच जागा उपलब्ध झाली नाही. त्यानंतर सह्यद्री रुग्णालयात एक जागा मिळाल्याने तेथे उपचार सुरू करण्यात आले.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या जागा बुहतांश रुग्णालयांमध्ये पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत. राखीव जागांमुळे इतर विकारांच्या रुग्णांनाही अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यांच्यावर इतर विभागात उपचार करण्यात येत आहेत. अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध होईल त्या प्रमाणात आवश्यक त्या रुग्णाला तेथे हलविण्यात येत आहे.

शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, त्यामुळे सर्वच खासगी रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागावर ताण येत आहे. रुबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागातील ३४ खाटा स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, आता तेथेही जागा उपलब्ध नसल्याने नव्याने येणाऱ्या रुग्णांवर इतर विभागांत उपचार करण्यात येत आहेत. अतिदक्षता विभागात जागा उपलब्ध झाल्यानंतर या रुग्णांना तेथे हलविण्यात येते. शहरातील रुग्णांना परत पाठविणे आम्ही टाळतो आहोत. मात्र, बाहेरगावहून चौकशी करणाऱ्यांना आम्ही न येण्याबाबत कळवितो आहोत.   – डॉ. प्राची साठे, रुबी हॉल, अतिदक्षता विभाग प्रमुख