स्वाईन फ्लूची चाचणी करून घेण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध व उपचार यांना अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत असतानाच आता शासनाने खासगी प्रयोगशाळांना स्वाईन फ्लूची चाचणी करण्यास परवानगी देण्याचे ठरवले आहे.
सध्या अगदी मोजक्या खासगी प्रयोगशाळांकडे स्वाईन फ्लूची तपासणी करण्याचा परवाना आहे. परंतु प्रयोगशाळा मोठय़ा संख्येने स्वाईन फ्लूसाठीची ‘रिअल टाईम पीसीआर’ ही चाचणी करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागत आहेत. यात प्रामुख्याने मुंबई व पुण्यातील प्रयोगशाळांचा समावेश आहे. या प्रयोगशाळांची तपासणी करून त्यांना परवानगी देण्यासाठी शासनाने आता एक समिती नेमण्याचे ठरवले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘‘मुंबईसाठी एक तसेच उर्वरित महाराष्ट्र व नागपूरसाठी एक अशा दोन समित्या स्थापन केल्या जाणार असून या समित्या त्या-त्या प्रयोगशाळांची पाहणी करून त्यांना परवानगी देणार आहेत. या समितीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, हाफकिन इन्स्टिटय़ूटमधील तज्ज्ञ, वैद्यकीय महाविद्यालयांच्या सूक्ष्मजीवशास्ज्ञ विभागाचे विभाग प्रमुख आणि राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. खासगी क्षेत्रात स्वाईन फ्लूच्या चाचण्या करण्यामध्ये स्पर्धा निर्माण झाल्यास चाचण्यांचे दर कमी होऊ शकतील.’’
पिंपरीच्या महिलेचा पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू
पिंपरीत राहणाऱ्या गीता नायर (वय ४५) यांचा पुण्यात स्वाईन फ्लूमुळे सोमवारी मृत्यू झाला. त्यांना शुक्रवारी स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले होते. स्वाईन फ्लूसह जंतूसंसर्गामुळे फुफ्फुसांना सूज येणे (अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) आणि विषाणूजन्य न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या उपचारांना ५ दिवसांचा उशीर झाला होता, अशी माहिती पालिकेने दिली. या मृत्यूमुळे पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २२ झाली असून यातील ११ जण पुण्यातील तर ११ रुग्ण पुण्याबाहेरून उपचारांसाठी आलेले होते. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचे ७० रुग्ण असून स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील दोन रहिवासी िपपरी-चिंचवडचे असून अन्य रुग्ण बाहेरून उपचारांसाठी आले होते, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिली. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी २० खाटांचा विलगीकरण कक्ष कार्यरत करण्यात आला असून संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ४८ खाटांचा स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.
रुग्णालयांना ‘टॅमी फ्लू’चा साठा ठेवण्याचा परवाना देणार
ज्या रुग्णालयांना किंवा औषधविक्रेत्यांना स्वाईन फ्लूवरील गोळ्यांचा साठा ठेवायचा आहे त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज केल्यास त्यांना प्राधान्याने परवाने दिले जातील, अशी माहिती औषध विभागाचे सह आयुक्त बा. रे. मासळ यांनी दिली. स्वाईन फ्लूवरील ‘ऑसेलटॅमीविर’ हे औषध ‘टॅमी फ्लू’ या ब्रँड नावाने ओळखले जाते. हे ‘शेडय़ूल एक्स’मधील औषध असून नशा आणणारी काही औषधे शेडय़ूल एक्समध्ये मोडतात. त्यामुळे ही औषधे विकण्यासाठी औषधविक्रेत्याला अन्न व औषध प्रशासनाचा विशेष परवाना घ्यावा लागतो. सध्या ज्यांच्याकडे हा परवाना आहे त्या औषधविक्रेत्यांची यादी  ७’ल्ल्रल्ल्िरं.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाकावाटे देण्याच्या लशीचे उत्पादन पुन्हा सुरू
सिरम या कंपनीने बाजारात आणलेल्या ‘नेझोव्हॅक एस’ या नाकावाटे देण्याच्या लशीचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या या लशीच्या नवीन बॅचच्या चाचण्या सुरू असून ती मार्चच्या अखेरीस बाजारात येऊ शकेल, अशी माहिती सीरमचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी दिली. आतापर्यंत या लशीला मागणी नसल्यामुळे ती बाजारात उपलब्ध नव्हती.