पुणे : ‘परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसाबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. या टास्क फोर्समध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा समावेश असेल,’ अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी दिली.

आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर), सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे लवळे येथे आयोजित डेस्टिनेशन इंडिया परिषदेचे उद्घाटन रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. रजनीश जैन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आयसीसीआरचे महासंचालक अखिलेश मिश्रा, सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी या वेळी उपस्थित होते.

निशंक म्हणाले, की आपल्याला मानवी भावनांची काळजी घ्यावी लागेल. आपण माणसाला यंत्रासारखे वागवू शकत नाही. यंत्रे आपल्या मदतीसाठी आहेत, आपल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नाहीत. सर्वाधिक तरुणांची संख्या भारतात आहे. त्यामुळे युवा शक्तीचा योग्य पद्धतीने वापर करून घेण्याची गरज आहे.’

परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी देशांतर्गत काम करतानाच परदेशातील उच्चायुक्तालयांद्वारेही प्रयत्न व्हायला हवेत. भारतामध्ये ज्ञानाचे केंद्र होण्याची क्षमता आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणेही आवश्यक आहे. शिक्षणाची एकूण गुणवत्ता उंचावण्यासह जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम, काही विशिष्ट विद्यापीठांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि भारतीय ज्ञान शिक्षण पद्धती, भारतीयशास्त्र, अवकाशशास्त्र, कला संस्कृती अशा विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे,’ असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

निशंक यांच्याकडून पुराणातील विषयांवरच भर..

परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे हा परिषदेचा विषय असताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांकडून मात्र पुराणातील विषयांवरच भर देण्यात आला. देशभरातील विद्यापीठांची सध्याची स्थिती, परदेशी विद्यार्थ्यांना भारतातील विद्यापीठांमध्ये काय व्हायला हवे यावर भर देण्याऐवजी निशंक यांनी चरक संहिता, आयुर्वेद, योग, चाणक्य, पाणिनीचे व्याकरण, उपनिषदे याच विषयांवर भर देत संशोधन, अभ्यासक्रमांची गरज व्यक्त केली.

१५ टक्के विद्यार्थ्यांची अट काढून टाकावी

भारतातील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे. पण त्यासाठी १५ टक्केच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची अट काढून टाकावी, असे डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी परिषदेत सुचवले.