लॉगइन आयडी, पासवर्ड चुकीचे; इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका मराठी माध्यमाला

पुणे : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांतील तांत्रिक अडचणी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्या. विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांचे लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळणे, अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिके त आकृती न दिसणे, इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका मिळणे असे प्रकार झाले. तसेच तांत्रिक अडचणींमुळे परीक्षेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन पाच परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठावर आली.

विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सोमवारी सुरू झाल्या. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ऑफलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. तर मंगळवारी ऑनलाइन परीक्षेत अनेक तांत्रिक अडचणी आल्या. असे असतानाही ७९ हजार विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार २३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन,तर ६ हजार २६८ पैकी ४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली.

अर्थशास्त्राच्या परीक्षेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका आल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नच समजले नाहीत. त्यामुळे अनेकांना प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवण्यासाठी वेळ पुरला नाही. असाच प्रकार अन्य अभ्यासक्रमातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाला. त्यांना इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका आली. मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्स विषयाच्या प्रश्नपत्रिकेत दहा प्रश्नांमध्ये आकृत्या नसल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवता आले नाहीत. विज्ञान पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्सऐवजी गणिताची प्रश्नपत्रिका मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगइन आयडी, पासवर्डसह अन्य विद्यार्थ्यांचा लॉगइन पासवर्ड देण्याच आला आहे. त्यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह आहे. परीक्षेतील तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी केली.

विद्यार्थ्यांना मनस्ताप

ऑफलाइन किंवा ऑनलाइन परीक्षांसंदर्भातील अडचणींबाबत विद्यार्थ्यांनी ८८२६५८७५८८, ९७१७७९६७९७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाने के ले आहे. मात्र या हेल्पलाइन क्रमांकावर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मनस्ताप होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

पाच परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठाला पाच परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. एमएस्सी केमिस्ट्री इन ऑर्गनिक रिअ‍ॅक्शन मेकॅनिझम, बीएस्सी रीअल एनॅलिसीस, एमएस्सी मॅथेमॅटिक्स अ‍ॅडव्हान्स्ड कॅलक्युलस, बी.कॉम बिझनेस मॅनेजमेंट (मराठी), बीएस्सी सॉलिड स्टेट फिजिक्स या परीक्षा १७ ऑक्टोबरला दुपारी ४ ते ५ या वेळेत होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.