खगोलप्रेमींच्या पदरी निराशा; विविध संस्थांच्या वतीने दुर्बिणीची व्यवस्था

खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व खगोलप्रेमींनी गुरुवारी सकाळीच जय्यत तयारी केली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे अगदीच थोडा वेळ ग्रहण पाहता आल्याने खगोलप्रेमींच्या पदरी काहीशी निराशाच पडली.

दुर्मीळ खगोलीय घटना असलेले खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी शहरातील विविध संस्थांतर्फे उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे काकासाहेब गाडगीळ पूल, नवनिर्मिती संस्थेतर्फे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच सौर चष्मेही वाटण्यात आले होते. आयुकामध्येही कार्यक्रम घेण्यात आला.

खगोलप्रेमी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच कार्यक्रम स्थळी दाखल होऊ लागले. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ग्रहण स्थिती नीट दिसू शकत नव्हती.  साधारण नऊ ते साडेनऊच्या दरम्यान काही वेळ ग्रहणाची स्थिती पाहता आली. ग्रहणाचा काळ संपल्यानंतर मात्र वातावरणात बदल होऊन स्वच्छ ऊन पडले.

‘प्रथम’तर्फे वसाहतींमध्ये जनजागृती

भारत फोर्ज अंतर्गत ‘प्रथम पुणे एज्युकेशन फाउंडेशन’तर्फे मुंढवा, हडपसर, रामनगर वारजे, लोहियानगर, मंगळवार पेठ, शिवाजीनगर, पाटील इस्टेट, पानमळा, जनता वसाहत विभागात सूर्यग्रहण दर्शन, जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. त्यात सहभागी झालेल्या नऊ हजार विद्यार्थी आणि नागरिकांना संस्थेतर्फे सौर चष्मे वाटण्यात आले. खगोल अभ्यासकांनी विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधून ग्रहणाबाबतचे समज-गैरसमजाबाबत जनजागृती केली. ‘प्रथम’ संस्थेचे स्मिता फाटक, अविनाश पेंडसे, शकुंतला वाघ, सुनंदा राऊत, अरुणा माने, रईसा सय्यद, अरुणा जाधव आदी या वेळी उपस्थित होते.