तापमानातील चढ-उतार कायम राहणार

पुणे : उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह घटल्याने पुणे शहर आणि परिसरातील किमाल तापमानात पुन्हा वाढ झाल्याने दिवसा उन्हाचा चटका जाणवतो आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहे. ते यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. तीन ते चार दिवस तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये शहर आणि परिसरातील तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणावर घट होत कमाल तापमानाचा पारा ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. त्यामुळे रात्री आणि पहाटे काहीसा गारवाही जाणवत होता. मात्र, मार्चच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान थेट ३७.४ अंशांवर पोहोचले. त्यामुळे उन्हाचा चटका वाढून रात्री उकाडा जाणवू लागला. त्यानंतर तीनच दिवसांनी उत्तरेकडून पुन्हा थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्याने कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत खाली आले. सद्य:स्थितीत कमाल तापमानाचा पारा पुन्हा वर जात असून, शुक्रवारी शहरात ३६.२ अंश कमाल आणि १४.८ अंश किमान तापमानाची नोंद झाली. शहरातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत १.५ अंशांनी अधिक आहे. तापमानातील हे चढ-उतार या आठवडय़ातही कायम राहणार असून, आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागातील कमाल तापमानातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, कोकणातील रत्नागिरी, मराठवाडय़ातील परभणी, बीड, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ आदी ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. राज्यात शुक्रवारी मालेगाव येथे ३७.८ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.