विदर्भात वादळी पावसाची शक्यता

राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या कमाल तापमानातील वाढ कायम आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ स्थिती आणि अवकाळी पावसाला पोषक हवामान निर्माण होत आहे. त्यामुळे विदर्भात सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडू व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि प्रामुख्याने विदर्भामध्ये कमाल तापमानात वाढ होत आहे. परभणी, वर्धा आणि अमरावती या भागांत कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर आदी ठिकाणी कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास आहे. मालेगाव, सांगली, सोलापूर या ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. मराठवाडय़ातील परभणीत ४१.२, तर नांदेडमध्ये ३९.४ अंशांवर कमाल तापमानाचा पारा आहे. विदर्भात अमरावती, नांदेडचे कमाल तापमान ४० अंशांपुढे जाण्याबरोबरच चंद्रपूर, अकोला, ब्रह्मपुरी, यवतमाळ आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंशांवर आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढत असून, दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत आहे.

सध्या वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्यांच्या संगमामुळे मेघगर्जना आणि विजांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे १८ मार्चला विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २१ मार्चलाही सोसाटय़ाचा वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.