अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा

पुणे : टाळेबंदीपासून तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर पुणे-दौंड मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. दीर्घ प्रतीक्षा आणि सातत्याने मागणी केल्यानंतर अखेर ही सेवा सुरू झाल्याने प्रवाशांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आता सर्वच नागरिकांसाठी रेल्वे सेवा सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टाळेबंदी लागू झाल्यानंतर देशभरातच सर्व रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. शिथिलीकरणानंतर हळूहळू रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबईतील उपनगरीय वाहतुकीसह पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल सुरू करण्यात आली. पुणे-लोणावळा लोकलमध्ये अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे. या मार्गाप्रमाणेच महत्त्वाच्या असलेल्या पुणे-दौंड मार्गावर मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे पुणे-दौंड दरम्यान रोजचा प्रवास गरजेचा असलेल्यांची मोठी गैरसोय होत होती. दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाच्या वतीने या मार्गावरील रेल्वे सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्याबाबत रेल रोकोचाही इशारा देण्यात आला होता. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घातले. राज्य शासनानेही याबाबत रेल्वेशी पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे अखेर रेल्वेकडून पुणे-दौंड मार्गावर शटल सुरू करून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली.

पुणे-दौंड मार्गावर २६ जानेवारीपासून रेल्वे सुरू करण्यात आली आहे. प्रवासी संघाकडून रेल्वे अधिकाऱ्यांना आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले. दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, कार्याध्यक्ष गणेश शिंदे, अय्युब तांबोळी आदी त्या वेळी उपस्थित होते. इतर प्रवाशांनाही या मार्गावरील रेल्वे सेवेची आवश्यकता असल्याने रेल्वेने सर्वांसाठी प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी केली आहे.

पुणे-दौंड रेल्वेचे वेळापत्रक

पुणे-दौंड मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची सुविधा देण्यात आली आहे. दररोज सकाळी ७.०५ आणि संध्याकाळी ६.१५ वाजता दौंडवरून पुण्यासाठी गाडी सोडण्यात येत आहे. या गाड्या अनुक्रमे सकाळी ८.५० आणि रात्री ७.५५ वाजता पुण्यात पोहोचतात. पुणे स्थानकावरून संध्याकाळी ६.४५ आणि सकाळी ७.०५ वाजता गाडी सुटते. या गाड्या अनुक्रमे रात्री ८.३० आणि सकाळी ८.५० वाजता दौंड स्थानकावर पोहोचतात.