लॉकडाउनच्याकाळात दळवळणाचे सर्वच पर्याय बंद असल्याने अनेक जण ठिकठिकाणी अडकून पडले होते. अनेक गरीब बेघर लोकांना तर फुटपाथवरच दिवस काढावे लागले. एका बिगारी काम करणाऱ्या कुटुंबालाही रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका गाडीमध्ये आसरा घ्यावा लागला. इथेच या कुटुंबातील गर्भवती महिलेनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे या महिलेचं सुखरुप बाळंतपण तिच्याच बारा वर्षांच्या मुलीनं केलं. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने त्यामुळे या मुलीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र, त्याचबरोबर लॉकडाउनचं भीषण वास्तवही समोर आलं आहे.

आईचं बाळंतपण करणार्‍या या बारा वर्षाच्या मुलीचं नाव मंगल रघुनाथ साळुंखे असून लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीने तिच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी तिने आपल्या आईवर आणि कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली. मंगल म्हणाली, “माझे वडील आणि आई येरवडा भागात बिगारी काम करतात. पण आता लॉकडाउनच्या या काळात त्यांची काम बंद झाली. कुटुंबाचं पालनपोषण करण अवघड बनलेलं असताना आईला मागच्या बुधवारी रात्री प्रसुती कळा सुरु झाल्या. या कठीण प्रसंगी मला आणि वडिलांना काय करावे सूचत नव्हते. आमच्याकडे पैसे नव्हते तर कोणी दवाखान्यातही घेऊन जाण्यास तयार नव्हते. मग आईच मला बाळंतपणाच्या प्रक्रियेतील बाबी सांगत गेली आणि मी तशी कृती करीत गेले आणि बाळाचा जन्म झाला. मला आणखी एक भाऊ झाला असून मी खूपच आनंदी आहे. आम्ही सर्वजण बाळाची काळजी घेत आहोत. पण आता केव्हाही जोरात पाऊस येऊ शकते. त्यामुळे तान्ह्या बाळाची काळजी वाटते.” आम्हाला गावी जायच आहे असं सांगताना तिनं यासाठी मदतीची अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

मंगलची आई कविता यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्या म्हणाल्या, “मला बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रसुती कळा येण्यास सुरुवात झाली. त्यावेळी आता कसं होणार असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला. सध्या करोनाचा काळ सुरु असल्यामुळे रस्त्यावर कोणीही नव्हते. रूग्णालयात जायचं म्हटलं तर आमच्याकडे पैसे देखील नव्हते. मग मी माझ्या मुलीला मंगलला काही गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे तिने त्या केल्या आणि मी बाळंत झाले. त्या नाजूक प्रसंगी माझ्या मुलीनं एवढ्या लहान वयात माझी खूप काळजी घेतली, असं सांगत असताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. कविता यांना ३ मुलं आणि २ मुली आहेत.

दरम्यान, मुलीचे वडील रघुनाथ साळुंखे म्हणाले, “अनेक वर्षांपासून मी आणि माझी पत्नी शहरातील अनेक भागात बिगारी म्हणून काम करत आहोत. लॉकडाउनमध्ये हाताला काम नव्हतं त्यामुळे जामखेड या मूळगावी जाण्यासाठी आम्ही निघालो होतो. पण शासनाच्या नियमानुसार कोणतीही वाहने जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकणार नसल्याने आणि त्याचदरम्यान पत्नीच्या प्रसुतीची तारीख जवळ आल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या गाडीच्या खालीच आम्ही राहण्याचं ठरवलं. त्याचदरम्यान माझ्या पत्नीला बुधवारी रात्रीच्या सुमारास मुलगा झाला. माझ्या १२ वर्षाच्या मुलीनेच तिचं बाळंतपण केलं. हा प्रसंग मी आयुष्यभर विसरणार नाही. तसेच आता या लहान बाळाची काळजी वाटते,” सरकारने आमची गावी जाण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.