पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन कांदा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने निघालेला हा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरुन थेट खाली कोसळला. यामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला असून चालक आणि क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, द्रुतगतीमार्गावरून जात असताना वलवन एक्झिट येथे हा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरुन थेट खाली जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कोसळला. यात चालक आणि क्लिनर हे गंभीर जखमी झाले मात्र, त्यांना मदत करायची सोडून परिसरातील नागरिकांनी पुलाखाली अस्ताव्यस्त पडलेला कांदा गोळा करायला गर्दी केली. लोकांना कांदा घेऊन जाणारा ट्रक कोसळल्याचे कळताच ते घरातून पिशव्या, मोठ्या गोण्या घेऊन घटनास्थळी आले. तसेच हा फुकटात मिळणारा कांदा आपल्या पिशव्यांमध्ये भरण्यातच मग्न होते, अशी माहिती लोणावळा पोलीसांनी दिली.

गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर जुना पुणे-मुंबई महामार्ग अर्ध्या तासासाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती कळताच लोणावळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गंभीर जखमी असलेल्या चालक आणि क्लीनरला खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर अर्ध्या तासाने वाहून सुरळीत झाली.