मी घेतलेली लस करोनाची नाही असं म्हणत सिरममध्ये जाऊन घेतलेल्या लशीवर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  मात्र मी आणि माझ्या स्टाफने घेतलेली लस ही करोनावरची नसून प्रतिकार शक्ती वाढवणारी आहे. कोविडवरची लस येण्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत वेळ लागेल असं सिरमकडून सांगण्यात आल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. लोकांना वाटते की मी लस घेतली आहे. अशी चर्चा लोकांमध्ये खासगी असते की सिरमचे प्रमुख पवारांचे वर्ग मित्र आहे. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल असं लोक बोलतात. पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही करोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

उत्तर प्रदेशातील दुर्दैवी घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला नाही, त्याऐवजी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अशा प्रकारची घटना आजपर्यंत देशातील जनतेने पाहिलेली नाही. एवढंच नाही तर उत्तर प्रदेश सरकारने कायदा हातात घेतला असून टोकाची भूमिका घेतली. या कृतीतून कायद्याला कवडीची किंमत दिली नाही हे स्पष्ट होत असून राहुल गांधी तिथे भेटण्यास जातात पण त्यांना जाऊ दिले नाही. त्यांना जाऊ द्यायला हवं होतं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे शांततेच्या मार्गाने तिथे गेले होते. तसंच त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायची होती. त्यांच्यासोबत जे काही घडलं तेही योग्य नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार देखील कोर्टात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर दहा जणांनी जावे. काहीही झाले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावावी हीच सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.