ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्या विरोधात सीबीआयने ९० दिवसात आरोपपत्र दाखल न केल्याने पुणे न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर केला आहे. तीन आरोपींना एकाच वेळी जामीन मिळाल्याने गुन्ह्याच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीबीआयचे तपास अधिकारी दिल्लीतील कामांमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे आम्हाला २० डिसेंबरपर्यंत वाढीव मुदत द्यावी अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती.

पुणे सत्र न्यायालयाने मात्र सीबीआयची मागणी फेटाळून लावली. तिघांच्या अटकेला ९० दिवस पूर्ण झाल्याने बुधवारी या तिघांच्या वकिलांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली आणि आज तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला. आरोपींना अटक केल्यानंतर ९० दिवसात आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते ही बाब सांगत आरोपींचे वकील धर्मराज चंडेल यांनी युक्तीवाद केला. तसेच ९० दिवस उलटल्याने आता त्यांना जामीन मंजूर करावा असेही चंडेल यांनी म्हटले आहे. ज्यानंतर न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.