पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी भागात चार सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भला मोठा आवाज झाला आणि काही काळ भीतीचे वातावरणही पसरले होते. स्फोटाचे आवाज ऐकताच तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. महाराष्ट्र कॉलनीत असलेल्या चिक्की बनवण्याच्या गोदामात हा स्फोट झाला. सुरुवातीला पाच सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तीन सिलिंडरचा स्फोट झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर पुढील एक ते दीड तासात अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करत कारखान्याला लागलेली आग नियंत्रणात आणली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काळेवाडीमधील महाराष्ट्र कॉलनीत वसीम शेख याचे चिक्कीचे गोदाम आहे.गोदामामध्ये आज दुपारी एक च्या सुमारास अचानक आग लागली,याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली,घटनास्थळी चार बंब पोहचले,एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.गोदामामध्ये मोठे गॅस सिलिंडर होते त्यामधील चार गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.यामुळे शेजारी आणि आजूबाजूच्या लोकांना याचा आवाज आला या घटनेमुळे काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोदामामध्ये कामगार किंवा इतर कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.या प्रकरणी गोदाम मालक वसीम शेख याच्यावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

अग्निशमन दलाचे कर्मचारी आग नियंत्रणात आणताना