संग्रहालयांमध्ये असणाऱ्या प्राचीन वस्तू, जीवाश्मांच्या अभ्यासातील मर्यादा त्रिमितीय मुद्रण (थ्रीडी प्रिटिंग) तंत्रज्ञानामुळे दूर झाल्या आहेत. जगभरातील अभ्यासक, शास्त्रज्ञांकडून प्राचीन, वस्तू जीवाश्मांच्या त्रिमितीय प्रतिमा मुक्त स्रोताद्वारे इंटरनेटवर उपलब्ध झाल्याने या प्रतिमांचे त्रिमितीय मुद्रण करणे शक्य झाले असून, मानवशास्त्रासारख्या विद्याशाखांसाठी त्रिमितीय मुद्रण तंत्रज्ञान उपयुक्त ठरते आहे.
मानवी उत्क्रांतीचे टप्पे, विश्वात, निसर्गात झालेल्या बदलांचा अभ्यास मानवशास्त्र, पुराजीवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र अशा विद्याशाखांच्या माध्यमातून केला जातो. त्यासाठी संशोधन, उत्खनन करून प्राचीन काळातील वस्तूंचा, जीवाश्मांचा शोध घेतला जातो. मात्र हे जीवाश्म सर्वच अभ्यासकांना, या शाखांच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला निअँडरथल किंवा होमोसेपियन मानवाच्या शरीराचा, डायनोसोरच्या शरीररचनेचा अभ्यास करायचा असल्यास पुस्तकांतील साधने अभ्यासण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र त्रिमितीय मुद्रणाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जगभरातील मुक्तस्रोताची चळवळ आता संशोधक, विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शंतनु ओझरकर म्हणाले, की गेल्या पाच वर्षांमध्ये जीवाश्मांच्या त्रिमितीय प्रतिमा जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधकांकडून इंटरनेटवर मुक्तस्रोत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रतिमा त्रिमितीय मुद्रण तंत्रज्ञानाच्या साह्याने मुद्रित करता येतात. त्यामुळे प्राचीन वस्तू, जीवाश्मांच्या प्रतिकृती तयार करून मानवशास्त्रसारख्या विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येते. वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध होणाऱ्या त्रिमितीय मुद्रकांद्वारे प्लॅस्टिक, धातूचे मुद्रण करता येते. तसेच गेल्या पाच वर्षांत नवनव्या तंत्रज्ञानामुळे साधनांच्या किमतीही आवाक्यात आल्या आहेत. मानवशास्त्रासह पुराजीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जीवशास्त्र, प्राणिशास्त्र, भूगोल, भूशास्त्र अशा विद्याशाखांनाही त्रिमितीय तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.
भारतात जीवाश्मांची उपलब्धता मर्यादित असल्याने अभ्यासासाठी पुस्तकांवर, प्रतिमांवर अवलंबून राहावे लागते. परदेशात विद्यार्थ्यांना जुन्या वस्तू, जीवाश्म पाहता येतात, अभ्यासता येतात. दगडी हत्यारे, मानवाची बदललेली शरीररचना, प्राण्यांची शरीररचना आदी प्रत्यक्ष पाहाणे आणि पुस्तकांतून अभ्यासणे यात फरक आहे. त्या दृष्टीने त्रिमितीय मुद्रण हा चांगला पर्याय आहे. जीवाश्मांच्या प्रतिकृती छोट्या स्वरुपात का होईना, प्रत्यक्ष हाताळतात येतात, असे डेक्कन कॉलेजच्या डॉ. वीणा मुश्रीफ त्रिपाठी यांनी सांगितले.
संग्रहालयाच्या पलीकडे…
पुराजीवशास्त्र, मानवशास्त्र असे संशोधनाचे विषय संशोधनाच्या पलीकडे जाऊन लोकप्रिय होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यात रस वाटणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्राचीन वस्तू, जीवाश्म प्रत्यक्ष पाहायला मिळायला हवेत. त्या दृष्टीने त्रिमितीय मुद्रण तंत्राचा वापर वाढल्यास संग्रहालयातील ज्ञान सर्वांसाठी मुक्त होऊन विद्यार्थी या शाखांकडे वळतील, असेही संशोधकांचे म्हणणे आहे.