राज्यातील पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका २० जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या संस्थेने पुढाकार घेऊन हा प्रकल्प तयार केला असून, राज्यातील दीड कोटी विद्यार्थ्यांना या मालिकेमुळे शिकण्याची संधी निर्माण झाली आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि तत्सम साधने उपलब्ध होण्यातील अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन मालिकेचे नाव टिलीमिली ठेवण्यात आले आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होणारी ही टिलीमिली मालिका विद्यार्थ्यांना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणीवर पाहता येईल. ही मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी या इयत्तांच्या पाठय़पुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असेल. त्यात व्याख्याने न देता मुलांना घरी आणि परिसरात करून बघता येतील, अशा कृतिनिष्ठ उपक्रमांचा समावेश आहे. रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे साठ पाठ साठ दिवसांत साठ भागांद्वारे सादर केले जातील. प्रत्येक आठवडय़ात सोमवार ते शनिवार असे सहा दिवस हे भाग सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे टिलीमिली ही मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल.

टिलीमिली मालिकेच्या प्रकल्पात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ‘ग्राममंगल’ आणि इतर नामांकित संस्था, तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग आहे. मालिकेत विद्यार्थ्यांना स्वच्छ, आनंदी वातावरण, भावनिक सुरक्षितता असेल. चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असेल. असे केल्याने मुले हसतखेळत स्वत:च कशी शिकतात, हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना ही मालिका रोज स्वत: शिकण्याची स्फूर्ती देईल, त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. कृतिनिष्ठ शिक्षणामुळे पालकही त्यात सहभागी होऊ शकतील. मराठी माध्यमाव्यतिरिक्त मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल. मालिकेचे आठही इयत्तांचे मिळून ४८० भाग २० जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत प्रसारित केले जातील.

विवेक सावंत, अध्यक्ष, एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन

मालिकेचे वेळापत्रक

वेळ                                      इयत्ता

सकाळी ७.३० ते ८.००              आठवी

सकाळी ८.०० ते ८.३०               सातवी

सकाळी ९.०० ते ९.३०                सहावी

सकाळी ९.३० ते १०.००            पाचवी

सकाळी १०.०० ते १०.३०           चौथी

सकाळी १०.३० ते ११                  तिसरी

सकाळी ११.३० ते दुपारी १२        दुसरी

दुपारी १२ ते १२.३०                       पहिली