व्यापाऱ्यांची मागणी; दुकाने उघडण्यासाठीच्या सम-विषम पद्धतीस विरोध

पुणे : शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करू नये तसेच यापुढील काळात दुकाने उघडण्यासाठीची सम-विषम दिनांक योजना राबाविण्यात आल्यास तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

व्यापारी महासंघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, विशेष अधिकारी सौरभ राव,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांना निवेदन देण्यात आले आहे. यापुढील काळात शहरात टाळेबंदी लागू करण्यात येऊ नये. यापूर्वी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात आला आहे. व्यापाऱ्यांकडून प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करण्यात आले आहे, असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी निवेदनात म्हटले आहे.

शहरातील व्यापाऱ्यांनी १७ मार्चपासून सर्व व्यवहार बंद ठेवले होते. राज्य तसेच केंद्र सरकारने टाळेबंदीचे आदेश दिल्यानंतर त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. १९ मे पासून ठरावीक व्यवसायाची दुकाने खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर ३ जून रोजी सम-विषम दिनांकानुसार दुकाने उघडण्याची योजना राबविण्यात आली. सम-विषम दिनांक योजनेमुळे महिन्यातून फक्त पंधरा दिवस दुकाने उघडी राहिली. त्यामुळे दुकाने उघडण्यात आल्यानंतर फक्त सात ते आठ टक्के व्यवसाय होऊ शकला, याकडे रांका आणि पितळीया यांनी लक्ष वेधले. शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने १३ जुलैपासून पुन्हा ११ दिवसांसाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. टाळेबंदी लागू झाल्यानंतर व्यापारीच नव्हे,तर सामान्यांमध्येही रोष निर्माण झाला आहे. व्यापार बंद असल्याने कामगार वर्गापुढे संकट उभे राहिले आहे. व्यापार सुरू असल्यास त्याअनुषंगाने अन्य छोटय़ा व्यावासयिकांचा उदरनिर्वाह होतो. यापुढील काळात टाळेबंदी लागू करण्यात येऊ नये तसेच सम-विषम दिनांकानुसार दुकाने उघडण्याची योजनाही राबवू नये, असे निवेदनात म्हटले आहे.