शास्त्रीनगर चौकात ‘बीआरटी’ मार्गावरील कठडे हटवले

पुणे : पुणे-नगर रस्त्यावरील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकातून जाणाऱ्या बीआरटी मार्गावरील लोखंडी कठडे हटवल्याने या चौकातील कोंडी फुटली आहे. नगर रस्त्यावरील सर्वात मोठा चौक असलेल्या शास्त्रीनगर चौकातील वाहतूक सुरळीत झाल्याने विमानतळ, नगर रस्ता तसेच पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग वाढल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.

नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकातून (कल्याणीनगर चौक) नगर रस्ता, विमानतळ तसेच पुण्याच्या दिशेने वाहने जातात. या चौकात सिग्नल असून बीआरटी मार्ग आहे. शास्त्रीनगर, नगर रस्ता भागात माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांची कार्यालये आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. शास्त्रीनगर चौक मोठा असूनही या भागात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी व्हायची. त्यामुळे  येरवडय़ातील गुंजन टॉकीज ते रामवाडीपर्यंतच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागायच्या. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळीत व्हायची. शास्त्रीनगर चौकातील पीएमपीच्या बीआरटी मार्गावरील लोखंडी कठडयांमुळे वाहनांना वळण घेणे अवघड व्हायचे. या  भागात जड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर आहे. एखादा ट्रक तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला कठडय़ांमुळे वळण घेणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जड वाहने या चौकातून वळण घेताना कोंडीत भर पडायची, असे येरवडा वाहतूक  शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी सांगितले.

शास्त्रीनगर चौकात कोंडी झाल्यानंतर अनेक दुचाकीस्वार बीआरटी मार्गावर शिरायचे. बीआरटी मार्गावरून दुचाकीस्वार जात असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. शास्त्रीनगर चौकाची वाहतूक पोलिसांनी पाहणी केली. या  भागातील कोंडीचे कारण शोधून काढले. तेव्हा चौकाच्या मधोमध असणाऱ्या बीआरटी मार्गावरील लोखंडी कठडय़ांमुळे वाहनांना चौकातून वळणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी या चौकाची पाहणी केली. त्यानंतर या चौकातील बीआरटी मार्गावरील कठडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला. आठवडय़ापूर्वी या मार्गावरील कठडे काढून टाकल्याने आता चौकातील कोंडी दूर झाली असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. पूर्वी कोंडी दूर करण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची नेमणूक करावी लागायची, असे साठे यांनी नमूद केले.

बीआरटी मार्गावरील कठडे काढल्यानंतर

* पुणे, नगर तसेच विमानतळाकडे जाणारी वाहतूक सुरळीत

* वाहतुकीचा वेग वाढला; शास्त्रीनगर चौकातील कोंडी फुटली

* नगर रस्त्यावरील आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वेळेत बचत

* अतिरिक्त पोलीस ठेवण्याची गरज नाही

* बीआरटी मार्गातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना चाप