पर्यटकांची लोणावळा, खंडाळ्यात गर्दी

लोणावळा : नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार, रविवारची सुट्टी आल्याने मुंबईकर मोठय़ा संख्येने पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा परिसरांत दाखल झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठय़ा संख्येने चारचाकी वाहने आल्याने मार्गावरील वाहतूक संथ झाली. पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर तसेच खंडाळा घाट, खालापूर टोलनाका पसिरात मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

शुक्रवारी (२५ डिसेंबर) पहाटेपासून खंडाळा घाट, खालापूर टोलनाका परिसरात कोंडी झाली होती. लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे लोणावळा शहरात कोंडी झाली. नाताळच्या सुट्टीला जोडून शनिवार आणि रविवारची सुट्टी आल्याने पर्यटक लोणावळ्यासह कोल्हापूर, महाबळेश्वर, पाचगणी, तुळजापूर, कोयना या पर्यटनस्थळांकडे मोटारीतून रवाना झाले. त्यामुळे पहाटेपासून द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन ठिकठिकाणी कोंडी झाली होती. अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाका तसेच मागे माडप बोगदा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

अर्धा दिवस कोंडीत..

नाताळ सणाला जोडून सुट्टी आल्याने मोठय़ा संख्येने बाहेर पडलेले पर्यटक कोंडीत अडकून पडल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुट्टीचा अर्धा दिवस कोंडीतच गेला, अशी भावना मुंबईतील पर्यटकांनी व्यक्त केली. मोठय़ा संख्येने वाहने घाटक्षेत्रात आली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि वेगही कमी झाला. एरवी घाट पार करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. शुक्रवारी घाट पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागत होते.

दरम्यान, खंडाळा घाटक्षेत्रात महामार्ग पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. घाट क्षेत्रात एखादा अपघात घडल्यास त्वरित वाहने बाजूला काढण्यासाठी जागोजागी क्रेन ठेवण्यात आल्या होत्या. घाट क्षेत्रातील कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते.

पुणे-बेंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा

’ नाताळाच्या सलग सुट्टीनिमित्त महाबळेश्वरपासून गोव्यापर्यंत पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे शुक्रवारी पुणे-बेंगळूरु महामार्गावर मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली. वाहनांच्या या गर्दीमुळे खेड-शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

’ शुक्रवारी नाताळ आणि त्यानंतर शनिवार-रविवार अशा सलग तीन दिवसांची सुट्टी आल्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी व गावाकडे जाण्यासाठी मोठय़ा संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळीपासूनच महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी झाली आहे. यातही खेड-शिवापूर आणि आणेवाडी टोल नाक्यावर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.