महिनाभरात नियम मोडणाऱ्या १५ हजार चालकांवर कारवाई

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बेदरकारपणे वाहने चालवून मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या वाहनचालकांवर महामार्ग पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिन्यात महामार्ग पोलिसांनी १५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली. मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या ५०० हून अधिक वाहनांवर सध्या दररोज कारवाई केली जात असून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे शिस्त मोडणाऱ्या वाहनचालकांना चाप बसत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ९४ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाचा वापर जड वाहने, मालवाहू वाहने, प्रवासी वाहने तसेच मोटारचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. द्रुतगती मार्गावर जड वाहनांसाठी तसेच मोटारचालकांसाठी मार्गिका निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेकदा वाहनचालक मार्गिकेची शिस्त मोडून बेदरकारपणे वाहने चालवितात. अशा प्रकारांमुळे वाहतूक विस्कळीत होते, त्याचबरोबर गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते.

महामार्ग पोलिसांनी जुलै महिन्यात शहरातील प्रमुख वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महामार्ग पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या होत्या. मार्गिकेची शिस्त मोडली जाऊ नये तसेच महामार्गावर वाहतुकीचे नियम पाळावेत, या व अशा विविध सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाई शिथिल केली होती.

कारण काय?

गेल्या महिन्यात पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर आणि त्यांच्या मोटारचालकाचा अपघाती मृत्यू झाला. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने त्यांना धडक दिली. या अपघातात डॉ. खुर्जेकर यांच्या बरोबर प्रवास करणारे दोन सहकारी वैद्यकीय तज्ज्ञ जखमी झाले होते. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या वाहनचालकां विरोधात कारवाई तीव्र केली.

.. तरीही अपुरीच

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा दोन्ही बाजूंनी वापर करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. दररोज किमान ८० हजारांहून जास्त वाहने द्रुतगती मार्गाचा वापर करतात. महामार्ग पोलिसांनी मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई तीव्र केली असली तरी वाहनांच्या संख्येच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण तसे नगण्यच आहे.

सप्टेंबर महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या १५ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. सध्याही दररोज ५०० पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. या पुढील काळात मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस पुणे विभाग