पावसाळ्यात विविध कारणांनी वीज जाऊ शकते. अतिवृष्टीने किंवा वादळाने तारा तुटून किंवा छोटासा बिघाड होऊन वीज गायब होते.. सध्या शहरातील बहुतांश भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांना वादळवाऱ्याचा धोका नाही, त्याचप्रमाणे त्या अत्यंत सुरक्षितही समजल्या जातात. मात्र, त्यांच्यात काही बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीची डोकेदुखी वीजवितरणाच्या कामातील सर्वात मोठी समजली जाते. या वाहिनीतील बिघाडाचे सर्वात मोठे व महत्त्वाचे कारण म्हणजे विविध विकासकामांसाठी खोदकामे करीत असताना होणारा हलगर्जीपणा.. हा हलगर्जीपणा नेमका पावसाळ्यात उघडा होतो अन् त्याचा फटका वीजग्राहकांबरोबरच महावितरण कंपनीलाही बसतो.
पावसाळ्याच्या दिवसामध्ये दर आठवडय़ाला शहरातील कोणत्या ना कोणत्या भागामध्ये सलग एक ते दोन दिवस वीज गायब होण्याचे प्रकार होत असतात. अशा प्रकारे वीज जाण्याच्या प्रकाराचे कारण भूमिगत वाहिनीतील बिघाडाचेच असते. यंदाही शहराच्या विविध भागामध्ये असे प्रकार घडले आहेत. ग्राहकांनी वीज कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क केल्यास त्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही किंवा वीज जाण्याचे नेमके कारणही सांगितले जात नाही, त्यामुळे ग्राहकांच्या संतापात भर पडत असते. भूमिगत वाहिनीतील बिघाडाला काही वेळा महावितरण कंपनी जबाबदार असते, पण बहुतांश वेळेला हा प्रकार रस्त्यांवर केल्या जाणाऱ्या खोदकामातील हलगर्जीपणामुळे होतो.

——— नेमके घडते काय?

भूमिगत वीजवाहिन्या टाकलेल्या भागामध्ये रस्त्याची दुरुस्ती किंवा इतर वाहिन्या टाकण्याचे काम ठेकेदारांमार्फत करण्यात येते. वास्तविक, खोदकाम करताना पूर्वी जमिनीच्या खाली असणाऱ्या वाहिन्यांच्या यंत्रणेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तसे होत नसल्याने कधी या वीजवाहिन्या तुटण्याचे प्रकार होतात. पण, हे प्रकार तत्काळ लक्षात येऊ शकतात. कधी-कधी खोदकाम करणाऱ्या यंत्राचा धक्का वाहिन्यांना लागतो. वाहिनी तुटत नाही, पण त्याला एखादा छेद पडतो. खोदकाम केलेले खड्डे बुजविले जातात. त्यानंतर खरी समस्या उभी राहते ती पावसाळ्यात. पावसाळ्यात वाहिन्यांपर्यंत पाणी पोहोचते. हे पाणी छेदातून आतमध्ये गेल्यास छोटासा अंतर्गत स्फोट होऊन ही वाहिनी बंद पडते.

——— दुरुस्तीसाठीची कसरत

अंतर्गत स्फोट होऊन बंद पडलेली वाहिनी दुरुस्तीसाठी एक कसरतच करावी लागते. वाहिनीत नेमका कुठे बिघाड झाला, हे शोधणे हे एक दिव्यच ठरते. अनेक ठिकाणी पुन्हा खोदून प्रत्येक टप्प्यावर वाहिनी तपासावी लागते. बिघाड सापडल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ वेगळाच, पण मुळात बिघाड शोधायलाच कधीकधी दिवस जातो. या प्रकारात ग्राहकांची गैरसोय तर होतेच, पण वीज वितरण कंपनीचेही नुकसान होते. त्यामुळे खोदकाम करणाऱ्या महापालिकेच्या ठेकेदारांसह सर्व यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय आवश्यक आहे, तरच हे प्रकार थांबू शकतील.