पुणे शहरातील काही शाळांना पीएमपीएमएलकडून पुरवण्यात येणाऱ्या बससेवेचे दर दुप्पट करण्यात आल्यामुळे काही शाळांनी बस सेवा नाकारल्या आहेत. शाळांच्या या निर्णयानंतर पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरवाढीच्या प्रश्नावर तुकाराम मुंढे म्हणाले की, ही दरवाढ नियमानुसार करण्यात आली आहे. शाळेने किंवा पालकांनी १४१ रुपये दर द्यावा आणि सेवा घ्यावी. पीएमपीएमएलने अजून किती दिवस तोटा सहन करायचा, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

पुणे शहरातील शाळांना गतवर्षी ६१ आणि नंतर ६५ रुपये दराने बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र आज अचानक १४१ प्रति कि.मी. दर करण्यात आले. पीएमपीएलच्या या निर्णयानंतर शहरातील तब्बल सात शाळांनी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीचे पडसाद आज पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेत देखील उमटल्याचे पाहायला मिळाले. बससेवा पूर्वीच्या दराने तातडीने सुरू कराव्यात. तसेच दरवाढ अन्यायकारक असून बससेवा पूर्ववत सुरू करा. तसेच अनुदानाचा काही प्रश्‍न असल्यास महापालिकेकडून सहकार्य करण्यात येईल, असे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीएमएलच्या प्रशासनाकडे पाठवले आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाच्यावतीने विद्यार्थांच्या विशेष वाहतुकीसाठी ३५ शाळांना ६९ बस पुरविल्या जातात. त्यातील १८ शाळा महापालिकेच्या तर उर्वरित खासगी संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. गुरुवारी पीएमपीएमएलने २८ शाळांना ५५ बस पुरविल्या. प्रशासनाने अचानक १४१ प्रतिकिलोमीटर दर वाढवल्यामुळे ७ शाळांनी १४ बस घेतल्याच नाहीत.
महापौरांनी पूर्वीचे दर ठेवण्यात यावे आणि महापालिका सहकार्य करेल, अशी मागणी प्रशासनाकडे केली असली. तरी देखील तुकाराम मुंढे दरवाढीवर ठाम आहेत. त्यामुळे येत्या काळात पुन्हा मुंढे विरुध्द लोकप्रतिनिधी असे युद्ध पाहावयास मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.