राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे पाठोपाठ अन्य शहरांमधील करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. पुण्यात आज दिवसभरात करोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

पुण्यातील  करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९ हजार ८२  झाली आहे.  आज अखेर ४२५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १४२ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ५ हजार ९२४ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

पुण्याप्रमाणे  पिंपरी-चिंचवड शहरातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, आज दिवसभरात तब्बल ९८ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील बाधितांची एकूण संख्या १ हजार ११० वर पोहचली आहे. पैकी, महानगर पालिकेच्या हद्दीत ५४४ जण तर हद्दीबाहेरील ८२ जण करोनामुक्त झालेले आहेत.  तर, दोन्ही हद्द मिळून आतापर्यंत एकूण ३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३४९३ करोना बाधित आढळले आहेत. तसेच १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३ टक्के इतके आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के इतका आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १७१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ४७ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला राज्यात ४६ हजार ६१६ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.