कावळेशेत (आंबोली) येथील दरीत पडलेल्या दोन युवकांच्या मृतदेहांपैकी प्रताप उजगरे या तरुणाचा मृतदेह गेल्या चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आज स्थानिक शोध पथकाने बाहेर काढला. तर, इम्रान गरदीचा मृतदेह धबधब्यात वाहून गेल्याने गेले पाच प्रयत्न करूनही तो मिळत नसल्याने लोणावळा येथून पाचारण केलेल्या ‘शिवदुर्ग मित्र’च्या पथकाने मृतदेह बाहेर काढला.

स्थानिक बचाव पथकांना इम्रान गरदी या तरुणाचा मृतदेह शोधण्यात अपयश येत असल्याने काल ५ ऑगस्ट रोजी लोणावळ्यातील ‘शिवदुर्ग मित्र’ चे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी सुरु केलेल्या शोध मोहिमेला यश आले. त्यांनतर काल सकाळी ११ वाजता मृतदेह बाहेर काढला त्यानंतर दुपारी २ वाजता तंत्रशुद्ध पद्धतीने मृतदेहवर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

यासाठी ‘शिवदुर्ग मित्र’च्या पथकाने ७०० फूट खोल दरीत दोरीच्या सहाय्याने उतरून शोधकार्य सुरु केले. दाट धुके, पाऊस आणि कोसळणारा धबधबा या सगळ्या अडचणींवर मात करत यश मिळवले. यासाठी सुनील गायकवाड, अजय राउत, आनंद गावडे, राजेंद्र कडू, गणेश गिध, रोहित वर्तक व प्रवीण देशमुख यांनी काम पाहिले.