पुणे : चार परदेशी महिलांनी दुबईहून तस्करी करून आणलेले दोन किलो सोने सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ६६ लाख ५० हजार ७७९ रूपये आहे. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या महिला मूळच्या सुदानच्या आहेत. त्यांनी शरीरात सोने लपविले होते. ससून रूग्णालयात या महिलांना तपासण्यासाठी नेण्यात आले. त्यानंतर शरीरात लपविण्यात आलेले सोने वैद्यकीय तज्ज्ञांनी बाहेर काढले.

खवला इलाहाडी अहमद अमारा, मावहिब मस्सी अहमद  एडम, सलमा सलाह मोहम्मद अहमद यासीन, मनाव एल्ताब अब्ददा मोहम्मद अशी कस्टमकडून ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या महिलांविरोधात भारतीय सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला दुबईहून बुधवारी सकाळी पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेतून घाईने निघालेल्या चौघींबाबत संशय आल्याने कस्टमच्या पथकाने त्यांची तपासणी सुरू केली. स्कॅनिंग यंत्राने दिलेल्या संदेशानंतर चौघींनी शरीराच्यात सोने लपविल्याचे उघड झाले. त्यानंतर तातडीने चौघींना ससून रूग्णालयात नेण्यात आले.

तपासणीत महिलांनी शरीरात सोन्याची दहा-दहा ग्रॅमची बिस्किटे लपविल्याचे उघड झाले. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी चौघींकडून दोन किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. यापूर्वीही त्या भारतात आल्याचे पारपत्रावरील नोंदीवरून आढळून आले आहे. उपायुक्त के. आर. रामाराव, हर्षल मेटे आणि पथकाने ही कारवाई केली.