पुण्यात येरवडा येथे करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंगसाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कारागृहातून दोन कैदी शनिवारी पहाटे पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षद सय्यद आणि आकाश बाबुराव पवार अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. बराच वेळ हे कैदी दिसत नसल्याने त्यांचा शोध घेतला असता. हे दोघे पळून गेल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.

राज्यातील विविध कारागृहांमध्ये कैद्यांना करोनाची बाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक कैद्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करुन काही कालावधीसाठी मुक्त केले आहे. त्याचबरोबर कैद्यामध्ये फिजिकल डिस्टंन्सिग राखण्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे कारागृह तयार करण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा भागातील एका संस्थेच्या इमारतीमध्ये तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास येथून दोन कैदी बाथरूमच्या खिडकीतून बाहेर उडी टाकत पळून गेले.