गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्यात झालेल्या दमदार पावसामुळे शहरात मंगळवारपासून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने सोमवारी घेतला. सध्या या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठ दिवसांसाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱया खडकवासला धरण प्रकल्पात रविवारपर्यंत २१.८१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. सोमवारीही दिवसभर पुणे शहरात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळेच महापालिकेने पुणेकरांना नेहमीप्रमाणे दिवसातून दोन वेळा पाणी देण्याचा निर्णय घेतला.
खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रात यंदा जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात २८ जून पासून १२ टक्के पाणीकपात करण्यात आली होती. या कपातीमुळे शहरात एक वेळ पाणीपुरवठा केला जात होता. या पाणीकपातीनंतरही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाणीसाठा आणखी कमी झाला होता. त्यामुळे १४ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे २५ जुलैपासून शहरात पुन्हा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.