धोरण स्पष्ट नसल्याने खालील मोकळ्या जागेत बेकायदा पार्किंग आणि कचऱ्याचे साम्राज्य 

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी शहर आणि उपनगरांमध्ये महापालिकेच्या वतीने उड्डाणपूल उभारण्यात आले असले तरी उड्डाणपुलाच्या खालील जागांबाबतचे स्पष्ट धोरण नसल्यामुळे उड्डाणपुलाखालील जागांचा कोणीही कशाही पद्धतीने वापर करीत असल्याचे चित्र दिसत आहे. उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत कुठे उद्याने तयार करण्यात आली आहेत तर काही ठिकाणी अनधिकृत पद्धतीने पार्किंग केले जात आहे. जप्त केलेल्या दुचाकी गाडय़ा ठेवण्यासाठीही या मोकळ्या जागेचा वापर होत असतानाच आता कचऱ्यानेही उड्डाणपुलाखालील मोकळी जागा व्यापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरात उड्डाणपुलाखाली कचरा असे चित्र सर्रास आहे.

वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी उड्डाणपुलांच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. उपनगरांकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले. यातील काही उड्डाणपूल हे वाहतुकीसाठी खुले झाले असून काही उड्डाणपुलांचे काम प्रस्तावित आहे. उड्डाणपुलाखालील जागांचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी या जागा मोकळ्या करण्याचे आदेश दिले होते. सध्या काही नगरसेवकांनी उड्डाणपुलाखाली छोटी उद्याने उभारली असून काही ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या चौक्याही आहेत. तर काही ठिकाणी मोकळ्या जागांचा वापर चक्क पार्किंगसाठी होत असून अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेले साहित्यही यापूर्वी उड्डाणपुलाखाली ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय खासगी बसथांबे, खाद्यपदार्थाच्या विक्रीचे स्टॉल्स, रिक्षाचालकांचे अनधिकृत थांबे, हातगाडय़ांनी उड्डाणपुलांखालील जागांना वेढले आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ही अतिक्रमणे वाढत असतानाच आता मोकळ्या जागेत कचरा टाकण्यात येत आहे.

शहरात कंटेनरमध्ये कचरा टाकण्याऐवजी अस्ताव्यस्तपणे रस्त्यावर कचरा फेकण्यात येत असल्यामुळे नागरिकांना शिस्त लावावी म्हणून कंटेनर हटविले गेले. त्यामुळे उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांमध्ये हा कचरा फेकण्यात येत आहे. याशिवाय राडारोडाही टाकण्यात येतो. त्यामुळे उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागांचा वापर नागरिकांकडून हव्या त्या पद्धतीने होत असल्यामुळे या जागा स्वच्छ ठेवण्याची मागणी होत आहे.